राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडपीठात समाविष्ट असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन केल्याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. या निकालानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांसह ताज हॉटेल मानसिंगमध्ये रात्रीचं जेवण घेतलं होतं, तसंच सर्वोत्तम वाईन मागवून सेलिब्रेशन केलं होतं, असा खुलासा गोगोई यांनी केला आहे.
अयोध्या खटला त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यातला एक महत्त्वाचा खटला होता. यामुळे ते चर्चेतही आले होते. गोगोई सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी आपल्या ‘जस्टीस फॉर द जज’ या आत्मचरित्रात आपल्या व्यावसायिक आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल खुलासा केला आहे. यात २०१८ मध्ये ४ वरिष्ठ न्यायाधीशांची झालेली पत्रकार परिषद, गोगोई यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप ते त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातल्या कार्यकाळाबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.
अयोध्या खटल्याचा निकाल सुनावल्यानंतरची संध्याकाळ आपल्यासाठी कशी होती, याबद्दल गोगोई लिहितात, “निकालानंतर, सरचिटणीसांनी अशोक चक्राच्या खाली न्यायालय क्रमांक १ च्या बाहेर न्यायाधीशांच्या गॅलरीत फोटो काढण्यासाठी बोलावलं होतं. संध्याकाळी मी खंडपीठाच्या सर्व न्यायाधीशांना ताज मानसिंग हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. आम्ही चायनीज फूड खाल्ले आणि तिथे असलेल्या सर्वोत्तम वाईनचा आस्वाद घेतला”.
तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील, अयोध्येचा निकाल देणार्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात तत्कालीन CJI-नियुक्त एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नझीर यांचा समावेश होता.न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या शिफारशी मागे घेण्याच्या आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावर, गोगोई लिहितात की तो निर्णय संवैधानिक संस्थांमधील संघर्ष टाळण्यासाठी महत्त्वाचा होता.