France Violence : नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत. नेपाळमधील Gen Z तरुणांचं आंदोलन संपूर्ण देशभर पसरल्यानंतर शेवटी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देत देश सोडला. सध्या देखील नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून तणावाची परिस्थिती आहे. नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला असल्याची माहिती समोर आली आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ८०,००० पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत २०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरले असून सरकारच्या धोरणांविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. आंदोलक आणि पोलिसांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये निदर्शकांनी बॅरिकेड्स आणि काही दुकांने पेटवल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले असून पॅरिस आणि इतर काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली आहे. या सगळ्या घटनेदरम्यान आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस तैनात, देशभरात गोंधळ
पॅरिससह फ्रान्सच्या अनेक शहरांत मोठ्या प्रमाणात गोंधळ होऊ नये म्हणून देशभरात अपवादात्मक ८०,००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतरही निदर्शकांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्सची तोडफोड, आग लावण्यासह जाळपोळ केली आहे. पॅरिसमधील कचऱ्याचे डबे पेटवत काही प्रमुख रस्त्यांवर अडथळे निर्माण केले आहेत. काही स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की सकाळी ९ वाजेपर्यंत राजधानीत ७५ लोकांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, त्यानंतरही अशांतता पसरल्याने दिवसभर या अटकेच्या कारवाईत वाढ करण्यात आली. दुपारपर्यंत पोलिसांनी देशभरात २०० जणांना अटक केली. या सर्व गोंधळामुळे देशात मोठ्या प्रमाणात वाहतुकीसह दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.
?BREAKING?:CHAOS IN FRANCE ??
— The_Independent (@TheIndeWire) September 10, 2025
Thousands flood streets in nationwide “Block Everything” protests against government economic policies. Clashes with police erupt, transport disrupted, 80,000 officers deployed as unrest mirrors Yellow Vest tensions. pic.twitter.com/yNoinBpA20
२० महिन्यांत फ्रान्समधील सरकार चौथ्यांदा कोसळलं
फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरतेचं सावट अधिकच गडद झाल्याचं दिसून आलं. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांचं सरकार सोमवारी कोसळलं. विशेष बाब म्हणजे गेल्या २० महिन्यांत चार वेगवेगळ्या नेत्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता पाचव्यांदा तिथे नवीन पंतप्रधानांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान बायरो यांचं सरकार कशामुळे कोसळलं?
देशात किमान ५१ अब्ज डॉलर्स इतकी वार्षिक बचत करून, आर्थिक शिस्त प्रस्थापित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. मात्र, त्यांच्या या प्रस्तावाला बहुमतानं नकार मिळाल्यानं पंतप्रधान बायरो यांचं सरकार कोसळलं. फ्रान्सच्या संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमधील ५७७ पैकी तब्बल ३६४ सदस्यांनी बायरो यांच्या सरकारच्या विरोधात मतदान केलं, तर १९४ सदस्यांची मतं त्यांच्या बाजूनं पडली. उर्वरित सदस्य गैरहजर किंवा तटस्थ राहिले. पंतप्रधान बायरो यांच्यासाठी हा मोठा पराभव ठरला. त्यामुळेच त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण होणार?
दरम्यान, संसदेत बायरो सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान झाल्यानंतर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अधिकृतरीत्या एक निवेदन जारी केलं. “मी मंगळवारी पंतप्रधान बायरो यांचा राजीनामा स्वीकारणार असून, पुढील काही दिवसांत नवीन पंतप्रधानांची नियुक्ती केली जाईल”, असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं. त्यांच्या या घोषणेनंतर देशातील सत्तासमीकरणं बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता फ्रान्सचे पुढील पंतप्रधान कोण होणार? याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.