Jagdeep Dhankhar Resigns : संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचं जगदीप धनखड यांनी सोमवारी सांगितलं. मात्र, त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला की त्यांना राजीनामा द्यायला लावला? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

खरं तर धनखड यांच्या राजीनाम्याचं कारण अनेकांना पटलेलं नाही. त्यांच्या राजीनाम्याची वेळ पाहून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, जगदीप धनखड हे आता लवकरच त्यांचं सरकारी निवासस्थान देखील सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, माजी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याच्या रात्रीच सामान बांधण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. उपराष्ट्रपतींचे निवासस्थान आणि कार्यालय दोन्ही असलेलं हे व्हीपी एन्क्लेव्ह सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे. जवळजवळ १५ महिने या ठिकाणी राहिल्यानंतर, माजी उपराष्ट्रपती धनखड आता हे निवासस्थान लवकरच सोडणार आहेत.

२०२२ मध्ये उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती

जुलै २०२२ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (एनडीए) जगदीप धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीनं त्यांच्याविरोधात मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली होती. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी ७१० वैध मतांपैकी ५२८ मते मिळवीत (७४.४%) दणदणीत विजय मिळवला. अलीकडच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमधील हा सर्वाधिक मताधिक्याने मिळवलेला विजय ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगदीप धनखड यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं?

२१ जुलै २०२५ रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. “प्रकृतीची प्राधान्यानं काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला देण्यात आल्यानं मी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. राज्यघटनेच्या कलम ६७ (अ)अंतर्गत मी स्वेच्छेनं हा निर्णय घेतला आहे,” असं त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. मात्र, त्यांनी आरोग्य स्थितीबाबत कोणतीही विशिष्ट माहिती उघड केलेली नाही. धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी आणि खासदारांचे आभार मानले, तसेच आपल्या कार्यकाळात लाभलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.