Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियने शनिवारी मोठी घोषणा केली आहे. कंपनी विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि एकमेव बचावलेल्या व्यक्तीला २५ लाख रुपयांची भरपाई देणार आहे.
टाटा सन्सने यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे, त्याव्यतिरिक्त ही अधिकची रक्कम दिली जाणार आहे.
“एअर इंडिया ही नुकतेच अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांबरोबर एकजूटीने उभी आहे. या अत्यंत कठीण काळात आमची टीम काळजी आणि पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे,” अशी पोस्ट विमान कंपनीने एक्सवर केली आहे.
आमच्या सततच्या प्रयत्नांचा भाग म्हणून एअर इंडिया प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना आणि वाचलेल्यांना त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी २५ लाख रुपये किंवा अंदाजे २१,००० जीबीपी अंतरिम मदत देईल. ही रक्काम टाटा सन्सकडून यापूर्वी जाहीर केलेल्या १ कोटी रुपये किंवा अंदाजे ८५,००० जीबीपी व्यतिरिक्त असेल, असे म्हटले आहेत.
अहमदाबादहून लंडनजाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत या विमानातून जात असलेल्य २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. विमानाबाहेरील व्यक्तींचा दुर्घटनेत मृत्यू झाला असला तरी त्यांनाही एक कोटीची मदत दिली जाणार असल्याचे टाटा ग्रुपने जाहीर केले आहे.
टाटा ग्रुपने दिलेल्या निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार आहे. जखमींना सर्वतोपरी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे.