Ahmedabad Air India Plane Crash Families of four victims sue Boeing Honeywell in US court : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ च्या भीषण अपघातात २६० जाणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर हे विमान बनवणाऱ्या कंपन्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

या दुर्घटनेतील मृत चार प्रवाशांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतील विमान बनवणारी कंपनी बोइंग (Boeing) आणि हनीवेल (Honeywell) यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. या कंपन्यांनी ‘बोइंग ७८७-८’ या विमानातील इंजिनच्या ‘फ्यूल कंट्रोल स्विच’बाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेत दाखल कलेला हा एकमेव खटला आहे.

कांताबेन धिरुभाई पाघडल, नाव्या चिराग पाघडल, कुबेरभाई पटेल आणि बाबीबेन पटेल यांच्या कुटुंबियांची बाजू मांडत असलेल्या लानियर लॉ फर्मने दिलेल्या माहितीनुसार, या खटल्याच्या माध्यमातून कंपन्यांकडून नुकसानभरपाई आणि दंडात्मक नुकसानभरपाई मागण्यात आली आहे. मात्र, या लॉ फर्मने दोन्ही कंपन्यांकडून नेमकी किती नुकसानभरपाई मागण्यात आली आहे याबद्दल माहिती दिली नाही.

डेलावेअर सुपीरियर कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला असून यामध्ये आरोप करण्यात आला आहे की सदोष फ्यूल कंट्रोल स्विचमुळे ही दुर्घटना घडली ज्यामध्ये २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा आणि जमिनीवर १९ लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट एआय १७१ ला उड्डाणानंतर काही क्षणातच अपघात झाला होता.

या विमान दुर्घटनेनंतर विमानातील फ्लूल कंट्रोल स्विचेस हा चर्चेचा विषय ठरला होता. कारण प्राथमिक तपासणीत असे आढळून आले होते की विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच दोन्ही स्विच ‘ रन (RUN)’ वरून ‘कटऑफ (CUTOFF)’ वर करण्यात आले होते. हनीवेल या कंपनीने तयार केलेले आणि बोइंगने बसवलेले हे स्विच ‘लॉकिंग मेकॅनिझम’सह तयार केलेले असतात, ज्यामुळे कोणी विमान हवेत असताना त्याच्याइंजिनचा इंधन पुरवठा चुकून बंद केला जाऊ नये.

खटला दाखल करणाऱ्यांनी म्हटले आहे की हे स्विच कंपनीने थ्रस्ट लीव्हर्सच्या मागे अगदी लागून बसवलेले आहेत आणि वैमानिक टेक ऑफ करताना सतत हे थ्रस्ट लीव्हर्स मागे-पुढे करत असतात. तसेच आरोप केला की, हनीवेल आणि बोइंग या दोन्ही कंपन्यांना कल्पना होती की लॉकिंग मेकॅनिथम चुकून सहज बंद होऊ शकते.

या खटल्यामध्ये अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) डिसेंबर २०१८ मध्ये जारी केलेल्या ‘स्पेशल एअरवर्दीनेस इन्फॉर्मेशन बुलेटिन’चा (SAIB) संदर्भ देण्यात आला आहे. एसएआयबीमध्ये फ्यूल कंट्रोल स्विच लॉकिंग फिचरमध्ये होऊ शकणाऱ्या बिघाडासंबंधी माहिती देण्यात आली होती.