Ahmedabad Plane Crash Reasons AAIB Submits Initial investigation Report : गेल्या महिन्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेशी संबंधित तपासात प्रगती होत असल्याचं पाहायला मिळत आहेत. भारतातील विमान अपघात तपास ब्युरोने (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था – AAIB) एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त एआय-१७१ या विमानाच्या अपघाताशी संबंधित प्राथमिक तपास अहवाल मंगळवारी नागरी उड्डाण मंत्रालयाला सोपवला आहे. हा या दशकातील सर्वात मोठा विमान अपघात होता.
दरम्यान, आज संसदेच्या लोक लेखा समितीची (PAC – Public Accounts Committee) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी होणार आहे. या बैठकीत नागरी उड्डाण विभागाचे सचिव व नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालकांना (DGCA) बोलावण्यात आलं आहे. या बैठकीदरम्यान एआय-१७१ या विमानाच्या अपघाताव्यतिरिक्त विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा मानकांवर देखील चर्चा केली जाईल.
पीएसीच्या बैठकीचा अजेंडा काय?
विमानतळ व सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी प्रवासी शुल्क, एअरलाइन्सचे शुल्क आणि इतर दर निश्चित करणे व त्यांचं नियमन करण्याशी संबधित विषय हे पीएसीच्या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील. यासह विमान व प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचे मुद्दे देखील यावेळी मांडले जातील.
अपघातात २७५ जणांचा मृत्यू
एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानाने १२ जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात हे विमान जवळच्याच मेघानी नगर परिसरातील रहिवासी भागात कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील क्रू सदस्यांसह २४१ जण जागीच ठार झाले. तसेच ज्या रहिवासी भागात हे विमान कोसळलं तिथले २४ नागरिक देखील या अपघातात मृत्यूमुखी पडले.
एएआयबीकडून अपघाताचा तपास
या दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने एएआयबीला या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले होते. २५ जूनपर्यंत एएआयबीने ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूलमधील डेटा प्राप्त केला होता. ब्लॅक बॉक्समधील डेटाची अचूकता तपासण्यासाठी गोल्डन चेसिसचा वापर करण्यात आला आहे.
अंतिम अहवालाद्वारे अपघाताचं कारण स्पष्ट होईल
या व्यापक तपास पथकात भारतीय वायूसेना, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड, अमेरिकन नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, बोइंग, जीई, एव्हिएशन मेडिसिन तज्ज्ञ, एअर ट्रॅफिक कंट्रोलचे अधिकारी सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या ‘अॅनेक्स १३’ आणि भारताच्या विमान अपघात व दुर्घटना नियम २०१७ च्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या दुर्घटनेचा तपास केला जात आहे. सरकार व तपास पथकांचं एएआयबीच्या अंतिम अहवालाकडे लक्ष आहे. याद्वारे अपघाताचं मुख्य कारण समोर येईल. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे, मानवी त्रुटींमुळे की अन्य कुठल्या कारणाने हा अपघात झाला होता ते अंतिम अहवालातूनच स्पष्ट होईल.