नवऱ्याने त्याच्या पासपोर्टवर प्रेयसीला पत्नी बनवल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अहमदाबादच्या वस्त्राल भागात रहाणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने या प्रकरणी रामोल पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार नोंदवली आहे. नवऱ्याने घटस्फोटाची खोटी कागदपत्रे सादर करुन हे सर्व घडवून आणल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
वस्त्रालच्या माधव पार्क सोसायटीमध्ये रहाणाऱ्या मंगला शर्मा यांचे २००२ साली सुशील शर्मा बरोबर लग्न झाले. या जोडप्याला दोन मुले आहेत. २०१० साली नवऱ्याच्या मोबाइलमध्ये मला एक महिलेचा फोटो दिसला. जेव्हा मी नवऱ्याला याबद्दल विचारले तेव्हा त्याने तुझा याच्याशी काही संबंध नाही असे सांगून उडवून लावले असे मंगला शर्मा यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
२०१७ साली सुनीलने मंगलाला मुंबईत आपण एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले. काही काळाने सुनीलच्या मित्रांनीच तो मुंबईत एका दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याचे सांगितले. मार्च २०१९ मध्ये मंगलाला अहमदाबादच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाचा टोकन नंबर मिळाला. जेव्हा तिने १३ मे ला यासंबंधी पासपोर्ट कार्यालयात चौकशी केली तेव्हा नवऱ्याने घटस्फोटाची खोटी कागदपत्रे सादर करुन पत्नीच्या कॉलममध्ये तिच्याजागी प्रेयसीचे नाव टाकल्याचे समोर आले. मी नवऱ्याला घटस्फोट दिलेला नसताना त्याने घटस्फोटाच्या खोटया कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करुन ती कागदपत्रे पासपोर्ट कार्यालयात जमा केली. रामोल पोलिसांनी सुनील विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.