वृत्तसंस्था, तिराना (अल्बेनिया)
‘आमच्या नवीन मंत्रिमंडळात एक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मंत्री असेल जो सार्वजनिक प्रकल्प आणि सार्वजनिक निविदांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात लढा देईल’, असा दावा अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी केला.
पंतप्रधान एडी रामा म्हणाले की ‘डीएला’ ज्याच्या नावाचा अल्बेनियन भाषेत सूर्य असा अर्थ आहे, तो मंत्रिमंडळाचा एक सदस्य आहे. तो प्रत्यक्ष उपस्थित नसला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेपासून तयार झाला आहे.’ रामा म्हणाले, की ‘सार्वजनिक प्रकल्पांच्या निविदा १०० टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील याची खात्री करण्यास डीएला मदत करेल. यामुळे जलद आणि पूर्ण पारदर्शकतेने काम करण्यास सरकारला मदत होईल,’ असा दावाही रामा यांनी शुक्रवारी त्यांच्या ‘फेसबुक’वर केला.
डीएला या वर्षाच्या सुरुवातीला ‘ई-अल्बेनिया’ सार्वजनिक सेवेत ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ म्हणून दाखल करण्यात आला. ११ मे रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत १४० पैकी ८३ विधानसभा जागा जिंकून रामा यांच्या समाजवादी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली. पक्ष एकट्याने राज्य करू शकतो आणि बहुतेक कायदे पारित करू शकतो, परंतु संविधान बदलण्यासाठी त्यांना दोन तृतीयांश बहुमत किंवा ९३ जागांची आवश्यकता आहे.