पॅरिस, नवी दिल्ली : टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर या विमान सेवा कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार एअर बस आणि बोईंग या विमाननिर्मिती कंपन्यांकडून सुमारे पाचशे जेटलायनर विमाने खरेदी करण्याची तयारी एअर इंडियाने केली असल्याचे समजते.
या ऐतिहासिक विमान खरेदीचा करार लवकरच होण्याची शक्यता आहे, असे हवाई वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी रविवारी रॉयटर्सला सांगितले आहे. हा खरेदी करार काही हजार कोटी डॉलरचा असेल. यात सुमारे चारशे अरुंद आकाराचे जेट आणि शंभर रुंद आकाराचे जेट खरेदी केले जातील. यात एअरबस ए-३५० आणि बोईंग ७८७ आणि ७७७ यांचा समावेश असेल. येत्या काही दिवसांतच या कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत एअर बस आणि बोईंग यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. टाटा समूहाकडूनही यावर तातडीने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.