फुकेतला जाणारे एअर इंडियाचे विमान शनिवारी सकाळी टेकऑफनंतर लगेचच हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. फ्लाईट रडार २४ कडून मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानावर चालणारे फ्लाइट IX110, हैदराबादहून सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले. या विमानाने २० मिनिटे उशीरा उड्डाण केले होते. हे विमान फुकेतमध्ये सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उतरणे अपेक्षित होते.
विमान का वळवले गेले याचे कारण मात्र अद्याप स्पष्टपणे उघड झालेले नाही. एअरलाइन आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
गुरूवारी सकाळी दिल्लीहून इंफाळला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उड्डाणानंतर लगेचच परतावे लागले. प्रवास पुन्हा सुरू करण्यापूर्वी विमानाची अनिवार्य तपासणी करण्यात आली आणि अखेर नियोजित वेळेच्या सुमारे साडेचार तासांनंतर इंफाळमध्ये उतरले.
फ्लाइट 6E-5118ने सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी आयजीआय विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र ते परत फिरले आणि सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी दिल्लीत सुरक्षितपणे उतरवले. तांत्रिक तपासणीनंतर ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास पुन्हा उड्डाण केले आणि दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी इंफाळमध्ये उतरले.
इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, १७ जुलै रोजी दिल्लीहून इंफाळला जाणाऱ्या फ्लाइट 6E-5118 मध्ये टेकऑफ झाल्यानंतर लगेचच एक किरकोळ तांत्रिक बिघाड आढळला. खबरदारी म्हणून वैमानिकांनी परतण्याचा निर्णय़ घेतला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.”
विमान कंपन्यांमध्ये तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात 6E-6271 हवेतच इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ते मुंबईला वळवण्यात आले. १९ जून रोजी लेहला जाणारे इंडिगोचो विमान तांत्रिक अडचणींमुळे जवळपास दोन तास हवेत राहिल्यानंतर दिल्लीला परत न्यावे लागले.
याआधी ६ मे रोजी बँकॉकहून मॉस्कोला जाणाऱ्या एरोफ्लॉट विमानाचे केबिनमध्ये अचानक धूर आल्यानंतर दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले.
एप्रिलमध्ये जेद्दाह-दिल्ली विमानाचे टायर फुटल्याच्या संशयामुळे आयजीआय विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. ४०४ प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान सुरक्षितपणे उतरले.