Air India Flight Emergency Landing : एअर इंडियाच्या एका विमानाला अचानक यू-टर्न घ्यावा लागल्याची घटना घडली आहे. हे विमान जयपूरहून मुंबईला जात होतं. मात्र, एअर इंडियाच्या या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

झालं असं की, एअर इंडियाचं एआय ६१२ हे विमान जयपूरवरून मुंबईकडे जाण्यासाठी निघालं होतं. या विमानाने उड्डाणही केलं. मात्र, उड्डाणानंतर काही वेळाने विमानात तांत्रिक बिघाडाचा संशय आला. त्यामुळे विमानाच्या पायलटने विमानाचा अचानक यू-टर्न घेतला आणि विमानाचं पुन्हा जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग केलं. ही घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, विमानात काही तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे अपघात होऊ शकला असता.

त्यामुळे खबरदारी म्हणून विमानाचं पुन्हा जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. जेव्हा विमानाचं इमर्जन्सी लँडिंग जयपूरमध्ये करण्यात आलं, तेव्हा संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्या विमानात कोणतीही तांत्रिक समस्या आढळून आली नाही. मात्र, विमानाची चौकशी केली असता असं आढळून आलं की विमानाने चुकीचे संकेत दिले होते. दरम्यान, चौकशीनंतर विमानाला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानाला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर हे विमान मुंबईकडे रवाना झालं. दरम्यान, प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं स्पष्टीकरण त्यानंतर एअरलाइनच्या प्रवक्त्याने दिलं. दरम्यान, बुधवारी नवी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला होता. त्यानंतर उड्डाण घेण्यापूर्वीच उड्डाण रद्द करावे लागले होते. त्याचवेळी केरळमधील कालिकतहून दोहाला जाणारे एअर इंडियाचे विमानही तांत्रिक समस्येमुळे परतावे लागले होते.