पीटीआय, नवी दिल्ली

एअर इंडियाच्या ‘एआय१७१’ या अपघातग्रस्त विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदाच्या फरकाने बंद झाला होता असे अपघातासंबंधी प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा इंधनपुरवठा कसा बंद झाला किंवा कोणी बंद केला याबद्दल कोणताही ठोस निष्कर्ष अद्याप काढता आलेला नाही. विमान अपघाताचा तपास करणाऱ्या ‘विमान अपघात अन्वेषण विभागा’ने (एएआयबी) आपला प्राथमिक अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला.

इंधनपुरवठा बंद झाल्यानंतर उडालेला गोंधळ कॉकपिटमधील वैमानिकांच्या मुद्रित संवादातून समोर आला आहे. ‘एएआयबी’च्या १५ पानी अहवालात असे लिहिले आहे की, एका वैमानिकाने (याची ओळख पटली नाही) दुसऱ्या वैमानिकाला असे विचारले की, ‘‘तू इंधनपुरवठा का बंद केलास?’’ त्यावर दुसऱ्या वैमानिकाने ‘‘मी तसे काही केले नाही,’’ असे सांगितले. दरम्यान, या प्राथमिक अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी वैमानिकांचे विशेष सत्र आयोजित करण्यात येतील अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली. अहवालानुसार, इंधनपुरवठा करणारी दोन्ही बटणे, जी इंजिन बंद करण्यासाठी वापरली जातात, ती विमानाने उड्डाण केल्यानंतर जवळपास लगेचच कटऑफ स्थितीला गेली होती. मात्र हे कसे घडले किंवा कोणी केले याचा अहवालात उल्लेख नाही.

या स्थितीला कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करायला नको. अंतिम अहवालाची प्रतीक्षा करूया. या तांत्रिक बाबी आहेत आणि त्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत. या टप्प्याला कोणतीही टिप्पणी करणे घाईचे ठरेल. आपल्याला काहीतरी ठोस माहिती मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. – के राममोहन नायडू, नागरी हवाई वाहतूकमंत्री

अहवालातील मुद्दे

विमानात एकूण ५४,२०० किलो इंधन

विमानाचे एकूण वजन २,१२,४०१ किलो; हे वजन परवानगी असलेल्या मर्यादेतच

विमानात कोणत्याही धोकादायक वस्तू नव्हत्या

विमानात भरलेले इंधन ज्या बाउसर आणि टँकमधून घेतले त्याच्या नमुन्याची ‘डीजीसीए’च्या प्रयोगशाळेत चाचणी, निष्कर्ष समाधानकारक

‘बी७८७८/८’ आणि ‘जीई जीईएनएक्स-१बी’ इंजिन चालक व निर्मात्यांविरोधात कोणत्याही कारवाईची शिफारस नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपास पथक अतिरिक्त पुरावे, नोंदी आणि माहितीचा आढावा घेईल आणि तपासून पाहील