Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या एका विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत तब्बल २७४ जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादहून लंडनकडे निघालं होतं. मात्र, विमानतळावरून उड्डाण केल्याच्या काही वेळातच एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान एका वसतिगृहावर कोसळलं आणि विमानाचा स्फोट झाला. या दुर्देवी घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, या अपघातामधून चत्मकारिकरित्या भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश हे सुखरुप बचावले.
विश्वासकुमार रमेश हे विमानातील सीट क्रमांक ११ ए वर बसलेले होते. या अपघातानंतर एका बाजूला आगीचे लोळ दिसत होते. मात्र, अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला विश्वासकुमार हे घटनास्थळावरून चालत बाहेर आले आणि स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत बसून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या घटनेत ते जखमी झाले, तरीही जखमी अवस्थेतच चालत जाऊन ते रुग्णवाहिकेत बसतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता विश्वासकुमार रमेश यांचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
या नव्या व्हायरल व्हिडीओमध्ये ते जखमी अवस्थेत पण व्यवस्थीत घटनास्थळावरून बाहेर चालत येताना दिसत आहेत. तसेच बाहेर येताना त्यांच्या हातात फोन दिसत असून व्हिडीओमध्ये काही लोक ओरडताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या पाठिमागे घटनास्थळावरून आगीच्या धुराचे मोठे लोट दिसत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत देखील न खचता या धुरांच्या लोटांमधून विश्वासकुमार रमेश हे बाहेर येताना दिसत आहेत.
अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.https://t.co/2jrmCKw8Ui#viralvidoes #socialmedia #AirIndiaPlaneCrash pic.twitter.com/SIIa7BdNGD
— LoksattaLive (@LoksattaLive) June 16, 2025
विश्वासकुमार रमेश यांनी काय म्हटलं?
विश्वासकुमार रमेश हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, “मी विमानातून उडी मारली नव्हती, तर माझ्या सीटसह मी फेकला गेलो. “मी जिथे पडलो, ती जागा सपाट होती.”, अशी माहिती विश्वासकुमार यांनी डीडी न्यूजशी बोलताना दिली. “विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमान वसतिगृहाच्या इमारतीला जाऊन आदळले होते. मी जिथे बसलो होतो, तो भाग आधीच जमिनीवर पडला. माझ्या बाजूला एक्झिट डोअर होता, त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो. पण माझ्या विरुद्ध बाजूला एक भिंत असल्यामुळे तिथल्या लोकांना विमानातून बाहेर पडणे शक्य झाले नसावे. मी बाहेर पडल्यानंतर विमानाचा स्फोट झाला, असंही त्यांनी सांगितलं.
खुर्चीसकट बाहेर फेकले गेले
विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच अपघात घडला. विमानात ते सीट क्रमांक ११ ए वर बसले होते. विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकले व जेथून विमानाचा एक भाग तुटला, तिथेच ११ए ही सीट क्र ११ होती. त्यांच्या सीटजवळच एक्झिट डोअर होते. त्यातून ते वेळीच बाहेर पडले. त्यानंतर विमानाचा स्फोट झाला. त्यामुळे ते बचावले.