Plane Crashes in Gujarat’s Ahmedabad: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाचं AI 171 हे ८७८ श्रेणीतील बोईंग ड्रीमलायनर विमान मेघानीनगर भागात उड्डाणानंतर अवघ्या अर्ध्या मिनिटात कोसळलं. अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यातून या दुर्घटनेचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी अपघातामागच्या वेगवेगळ्या शक्यतांची चर्चा सुरू झाली आहे. अपघातामागच्या चर्चेतील तीन कारणांमध्ये दोन्ही इंजिन बिघडल्याच्या कारणाचाही समावेश आहे. अमेरिकन लष्करातील माजी पायलट व हवाई उड्डाण तज्ज्ञ कॅप्टन स्टीव्ह शेबनर (Steve Scheibner) यांनी यासंदर्भात एक मोठा दावा केला आहे. विमान अपघातग्रस्त होण्याच्या काही सेकंद आधी विमानात RAT ही यंत्रणा आपोआप कार्यान्वित झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अहमदाबाद विमान अपघाताची ३ चर्चेतील कारणं
स्टीव्ह शेबनर यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये तीन कारणांचा उल्लेख केला आहे.
१. यातील पहिलं कारण म्हणजे विमानाचे दोन्ही इंजिन एकाच वेळी फेल झाले. एखाद्या पक्ष्याने धडक दिल्याने किंवा इंधन पुरवठा बाधित झाल्याने हे होऊ शकतं.
२. दुसरं चर्चेतलं कारण म्हणजे विमानाच्या फ्लॅपचे सेटिंग्ज बिघडले होते. त्यामुळे टेकऑफ करताना विमानाचे फ्लॅप बंद असण्याऐवजी उघडे राहिले.
३. तिसरं कारण म्हणजे पायलटची चूक. पायलटनं चुकून विमानाचे लँडिंग गिअर वर उचलण्याऐवजी फ्लॅप वर उचलले असावेत.
अपघाताच्या Video च्या मदतीने नवा दावा!
दरम्यान, स्टीव्ह शेबनर यांनी विमान कोसळलं त्या क्षणाचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ शेअर करून त्यातील एका अत्यंत लहानशा राखाडी रंगाच्या ठिपक्याच्या आधारे अपघातामागील कारणासंदर्भात एक मोठा दावा केला आहे. हा छोटासा ठिपका म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून RAT असल्याचं स्टीव्ह शेबनर यांचं म्हणणं आहे.
स्टीव्ह शेबनर यांनी केलेल्या दाव्यानुसार, शेवटच्या क्षणाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये विमानाच्या उजव्या बाजूच्या पंखाच्या खाली एक छोटासा राखाडी रंगाचा ठिपका दिसत आहे. हा ठिपका म्हणजे आरएटी अर्थात Ram Air Turbine असल्याचं स्टीव्ह शेबनर यांचं म्हणणं आहे. यावरूनच दोन्ही इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्याच कारणाला पुष्टी मिळत असल्याचं शेबनर यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
काय आहे RAT प्रणाली?
विमानाखालच्या राखाडी ठिपक्यावरून हे स्पष्ट होतं की शेवटच्या क्षणी विमानातून RAT ही प्रणाली सुरू करण्यात आली होती, असा दावा स्टीव्ह शेबनर यांनी केला आहे. “Boing 787 Dreamliner या श्रेणीतील विमानांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आलेली असते. प्रामुख्याने इंजिनमध्ये बिघाड झाल्यास किंवा इंधन वा इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे बंद झाल्यास शेवटचा उपाय म्हणून रॅट प्रणाली अशा विमानांमध्ये आपोआप कार्यान्वित होते. या प्रणालीमुळे विमानाला किमान काही काळासाठी उड्डाण घेऊन एटीसीशी संपर्क प्रस्थापित करता येऊ शकतो”, असं स्टीव्ह शेबनर यांचं म्हणणं आहे.
ही प्रणाली म्हणजे विमानाच्या उजव्या पंखाच्या खालच्या बाजूला असलेल्या विशिष्ट कम्पार्टमेंटमधून अशा आणीबाणीच्या प्रसंगी एक टर्बाईन इंजिन बाहेर येतं. पाण्यातील एखाद्या बोटीला असणाऱ्या इंजिनप्रमाणे हे इंजिन काम करतं. यातून विमानाला काही प्रमाणात उड्डाणाची ताकद आणि वेळ मिळू शकतो, असंही स्टीव्ह शेबनर यांच्या व्हिडीओमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
Black Box च्या तपासणीची प्रतीक्षा!
दरम्यान, ब्लॅक बॉक्स फॉरेन्सिक टीमला सापडला असून त्यातून शेवटच्या काही मिनिटांमध्ये कॉकपिटमध्ये काय संभाषण झालं आणि डिजिटल यंत्रणेवर कोणते संदेश पाठवण्यात आले, यासंदर्भातली माहिती समोर येऊ शकेल. “RAT संदर्भातल्या माहितीमुळे दोन्ही इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या अंदाजाला पुष्टी मिळत असली, तरी अजूनही आपण पहिल्या पायरीवर कायम आहोत. दोन्ही इंजिनमध्ये एकाच वेळी बिघाड कसा झाला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे”, असं शॅबनर म्हणतात.