Air India Plane Crash One Passenger survived: अहमदाबाद येथून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्यानंतर विमानातील सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता गुजरात पोलिसांनी एक प्रवासी जिवंत असल्याचे सांगितले आहे. ४० वर्षीय रमेश विश्वासकुमार हे या भीषण अपघातामधून बचावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील रमेश यांची रुग्णालयात भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली.

रमेश विश्वासकुमार हे सध्या उपचार घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अपघातानंतर स्वतःच्या पायावर चालत जात असल्याचा त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रमेश विश्वासकुमार हे एअर इंडियाच्या विमानात ११अ या सीटवर बसले होते. त्यांचा बोर्डिंग पासही आता समोर आला आहे.

अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, “११अ या सीटवर बसलेले प्रवासी सुखरुप आहेत. ते एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळून आले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची नेमकी माहिती देता येणार नाही. विमान निवासी भागात कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.”

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, रमेश विश्वासकुमार हे ब्रिटिश नागरिक असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतात आले होते. अजय कुमार रमेश (४५) यांच्यासह ते पुन्हा लंडनला जाण्यासाठी या विमानात बसले होते.

air india plane crash survivor
रमेश विश्वासकुमार यांचे यादीत नाव आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना रमेश विश्वासकुमार यांनी सांगितले की, अपघातानंतर मी खाली कोसळलो आणि माझी शुद्ध हरपली. जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच होता. मी घाबरलो आणि उठून पळू लागलो. कुणीतरी मला मदत केली आणि रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात दाखल केले.

रमेश पुढे म्हणाले की, ते २० वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहेत. त्यांची पत्नी आणि मुले तिथेच आहेत.

अनेक मृतदेह जळून खाक, ओळख पटवणं कठीण

विमान अपघातामुळे अनेक प्रवशांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटवणे बाकी आहे. आता डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल. गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितले की, अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणे अगदीच कठीण झाले आहे.