इतर प्रदूषक कमी झाले तरीही ओझोनच्या पातळीत वाढ

टोरंटो : भारतातील पहिल्या टाळेबंदीच्या दरम्यान हवेच्या गुणवत्तेत अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही, तसेच इतर प्रदूषक कमी झाले तरीही ओझोनची पातळी वाढली आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

भारतातील पहिल्या टाळेबंदीच्या कालावधीत गेल्या वर्षी वाहनांमधून उत्सर्जन कमी झाल्याने वायू प्रदूषणात मोठी घट झाली. मात्र, धुके नसलेले निळे स्वच्छ आकाश फसवे ठरू शकते. कारण त्यामुळे संभाव्य आरोग्य समस्या निर्माण करणारे प्रदूषक सहजासहजी दिसून येत नाहीत, असे कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांनी निरीक्षनात्मक अभ्यास अहवालावरून म्हटले आहे. 

काही वायू प्रदूषक अपेक्षेनुसार कमी झाले नाहीत आणि मात्र आश्चर्याची बाब म्हणजे इतके प्रदूषक कमी होऊनही ओझोनची पातळी वाढली. त्या कालावधीत हवा खूपच स्वच्छ दिसत होती, परंतु त्यामुळे अधिक सूर्यप्रकाश मिळून झिरपल्याने ओझोन३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची  स्थिती निर्माण झाली, असे संशोधकांनी म्हटले आहे.

पहिल्या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच २४ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत भारतातील दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांमधील नायट्रोजन ऑक्साइड्स, घातक सूक्ष्म कण (पीएम २.५) आणि ओझोन तसेच हवामानविषयक घटकांचा विशेष अभ्यास या संशोधनात करण्यात आला. भारतातील वायू प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात येत आहेच शिवाय येथील अतिशय घातक प्रदूषणामुळे मृत्यू दर आणि रोगांच्या प्रमाणात वाढ होत.  संशोधकांनी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवरून पीएम २.५, नायट्रोन ऑक्साइडस् आणि ओझोनच्या पातळीचा प्रत्येक तासाचा तपशील अभ्यासला. तसेच टाळेबंदीमुळे झालेल्या बदलांचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांनी या तपशिलाची मागील तीन वर्षांतील समान तारखांशी तुलना केली. केवळ निरीक्षणात्मक तपशील विचारात घेतल्यास, नायट्रोन ऑक्साइडस् आणि पीएम २.५ पातळी अनुक्रमे ५७ टक्के आणि ७५ टक्क्यांनी घसरली. तर हवामानशास्त्राचा विचार केला असता दोन्ही शहरांमध्ये पीएम २.५ची टक्केवारी ८ टक्क्यांनी कमी झाली तर ओझोन ५ ते ३०टक्क्यांनी वाढला असे संशोधकांनी सांगितले.

प्रभावी उपायांकडे लक्ष देण्याची गरज

संशोधकांना असे आढळून आले की उत्सर्जनाचे स्थानिक स्त्रोत, जसे की वाहने आणि इंधन जाळणे, यांचा वायू प्रदूषण स्तरावर प्रादेशिक उत्सर्जन स्त्रोतांपेक्षा कमी प्रभाव पडतो. तर हवामानातील बदल आणि वातावरणातील रासायनिक प्रक्रिया वायू प्रदूषकांच्या पातळीत स्वतंत्रपणे वाढ करतात. दिल्लीतील ओझोन निर्मितीवर वायूरूप सेंद्रिय संयुगे (व्हीओसी)चा परिणाम होतो त्यामुळे ते कमी करण्याच्या प्रभावी उपायांकडे लक्ष दिले पाहिजे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.