Air strike on two Myanmar schools: म्यानमारमधील रखाइन राज्यात झालेल्या हवाई हल्ल्यात किमान १९ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर २२ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वांशिक सशस्त्र गट अराकान आर्मी (AA) ने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे. एएफपी वृत्तसंस्थेने (AFP) याबाबत वृत्त दिले आहे.

म्यानमारमधील रखाइन राज्यातील Kyauktaw टाउनशिपमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अराकान आर्मी (AA) आणि म्यानमारच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष होता यादरम्यान ही घटना घडली. एएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हवाई हल्ल्यात दोन खासगी शाळांना लक्ष्य करण्यात आले. यात १५ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यासाठी देशातील लष्करी राजवट जबाबदार असल्याचा आरोपही या गटाने केला आहे. “निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल आम्हाला पीडित कुटुंबीयांप्रमाणेच दुःख होत आहे,” असे एएने त्यांच्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तर दुसरीकडे लष्करी गटाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. म्यानमार नॉऊ या स्थनिक वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लष्करी विमानाने दोन ५००- पाउंड वजनाचे बॉम्ब शाळेवर टाकले, यावेळी विद्यार्थी हे झोपेत होते.

तर संयुक्त राष्ट्राची लहान मुलांसाठी काम करणारी संस्था ‘युनिसेफ’ने (UNICEF) या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी घटनेला क्रूर हल्ला असे म्हटले असून या भागात वाढत्या हिंसाचाराचा एक पॅटर्न असल्याचे म्हटले आहे. ही घटना राखइन राज्यात वाढत असलेल्या विनाशकारी हिंसाचाराची स्थिती दर्शवतो, ज्याची लहान मुले आणि कुटुंबे सर्वात भीषण किंमत मोजत असल्याचे युनिसेफने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

ही नुकतेच झालेली एअर स्ट्राइक ही रखाइन भागात सुरू असलेल्या लष्करी कारवाईचा भाग आहे. गेल्या वर्षभरात या भागात एएने मोठ्या प्रमाणात भाग ताब्यात घेतला आहे. २०२१ मध्ये आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्या लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून म्यानमार राजकीय आणि सशस्त्र संघर्ष पेटला आहे. या घटनेनंतर देशभरात लष्कराच्या विरोधात सशस्त्र प्रतिकार सुरू झाला.

हा हवाई हल्ला झालेल्या भागाशी संपर्क मर्यादीत स्वरूपात आहे, कारण तिथे इंटरनेट आणि फोन सेवा तुरळक आहे. म्यानमारचे लष्कर देशातील संघर्षग्रस्त भागांमध्ये नागरी वस्त्यांवर हवाई हल्ले करत असल्याचा आरोप वारंवार होत आहे.