जिओ पाठोपाठ एअरटेलची ‘डेटा’गिरी; १०० रुपयांमध्ये देणार १० जीबी डेटा

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची नवी योजना

संग्रहित छायाचित्र

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मंगळवारी नव्या योजनांची घोषणा केली. हॅप्पी न्यू इयर योजनेच्या समाप्तीची घोषणा करतानाच प्राईम मेंबर्ससाठी दर दिवशी १० रुपयांमध्ये १ जीबी डेटा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलनेसुद्धा डेटागिरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या १०० रुपयांमध्ये १० जीबी अधिक डेटा देणार असल्याचे मेसेज एअरटेलकडून पोस्टपेड वापरकर्त्यांना पाठवण्यात आले आहेत.

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी नवीन योजना आणली आहे. आतापर्यंत एअटेलकडून ५४९ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा ४जीच्या वेगाने मिळायचा. आता याच प्लानमध्ये १०० रुपये अधिक खर्च करायची तयारी असेल, तर एअरटेलच्या वापरकर्त्यांना १० जीबी डेटा ४जीच्या वेगाने मिळेल. म्हणजेच एअरटेलचे वापरकर्ते ६४९ रुपयांमध्ये (करांची रक्कम न धरता) १३ जीबी डेटा ४जीच्या वेगाने वापरु शकतात.

एअरटेलने डेटा प्लानच्या किमतींमध्ये मोठी घट करुन जिओला जोरदार टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरीही आजच्या घडीला जिओचे प्लान एअरटेलपेक्षा स्वस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण जिओकडून कॉलिंग आणि रोमिंग मोफत आहेत. यासोबतच एअरटेलची नवी ऑफर ज्या लोकांना कंपनीकडून मेसेज पाठवण्यात आला आहे, त्यांनाच लागू असणार आहे. त्यामुळे हा प्लान सगळ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे की फक्त मर्यादित ग्राहकांसाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये या प्लानचा आवाका वाढवला जाण्याची शक्यता आहे.

याआधीही एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी अनेकदा प्लानच्या किमती कमी केल्या आहेत. जिओच्या फ्रि कॉलिंगसोबत स्पर्धा करण्यासाठी एअरटेलने ५४९ च्या प्लानमध्ये अमर्यादीत एसटीडी आणि लोकल कॉल्सचा समावेश केला आहे.

मंगळवारी जिओच्या विविध प्लान्सची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी जिओचे डेटा दर इतर कंपन्यांच्या डेटा दरांच्या तुलनेत २० टक्क्यांनी स्वस्त असतील, असे म्हटले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये इतर कंपन्यांनी त्यांचे दर जिओच्या दरांइतके करण्याचा प्रयत्न केला, तर जिओकडून दरांमध्ये आणखी घट करावी लागेल. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कंपन्यांमधील डेटागिरी तीव्र होणार आहे. याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Airtel 10gb data offer in rs 100 to counter reliance jio