अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात दुप्पटीने वाढ करीत पुढील वर्षापासून ते ५० लाख रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. गुजरातमधील बडोदा येथे ९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

राज्याचे सांस्कृतिक वैभव असलेले साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनासाठी राज्य शासनातर्फे प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरेसे होत नसल्याने संमेलनाचे अनुदान वाढवण्याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता.

शुक्रवारी दुपारी बडोद्यात संमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला बडोद्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत.