Akhilesh Yadav दिल्लीतील संसद भवनाजवळ असलेल्या मशिदीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित बैठक घेतल्याचा वाद आता आणखी चिघळला आहे. भाजपाचा अल्पसंख्याक मोर्चा आणि उत्तराखंड वक्फ बोर्डाने या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया देत आक्षेप नोंदवला आहे. मशिदीला तुम्ही राजकारणाचा मंच बनवला आहे. फक्त आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या नाहीत तर राजकीय मर्यादाही ओलांडल्या गेल्या आहेत असंही भापाने म्हटलं आहे.
भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जमाल सिद्दिकी काय म्हणाले?
“संसदेजवळच्या मशिदीत बैठक घेऊन अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांनी धार्मिक मर्यादांचं उल्लंघन केलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या मशिदीचे इमाम मोहिबुल्लाह नदवी यांनी या दोघांना मशिदीत बैठक घेण्याची संमती कशी दिली? डिंपल यादव या मशिदीत चुकीच्या पद्धतीने बसल्या होत्या” असंही सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. तसंच या दोन्ही नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा अशीही मागणी केली आहे.
दुसरं कुणी असं वागलं असतं त्यावरुन गदारोळ झाला असत्ता-सिद्दिकी
जमाल सिद्दिकी म्हणाले, जर दुसरा एखादा नेता असं काही वागला असता तर त्यावरुन राजकीय वादळ सुरु झालं असतं. जे स्वतःला मुस्लिमांना नेता मानतात ते असदुद्दीन ओवैसी झालेल्या प्रकाराबाबत गप्प का असाही सवाल सिद्दिकी यांनी विचारला आहे. धार्मिक स्थळांवर राजकीय बैठका घेतल्या जाऊ नयेत यासाठी आम्ही २५ जुलैला बैठक घेणार आहोत. यामध्ये अशा प्रकारे मंदिर किंवा मशिदीचा दुरुपयोग कुणीही न करण्यासंबंधीचा ठराव पास केला जाईल
वक्फ बोर्डाने या प्रकरणी काय म्हटलं आहे?
या प्रकरणात वक्फ बोर्डाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मशिद असो किंवा मंदिर ते प्रार्थना स्थळ आहे. या ठिकाणी देवाची प्रार्थना केली जाते. राजकीय युद्धाचा हा काही आखाडा नाही, अखिलेश यादव यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी यादव यांनी केली आहे.
अखिलेश यादव यांनी का स्पष्टीकरण दिलं?
मशिदीत बैठक घेतल्याचा वाद उफाळून आल्यानंतर अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर कुठल्याही धर्मातली आस्था ही लोकांना जोडण्याचं काम करत असते. भाजपाला मात्र याच्याशी काही घेणंदेणं नाही. भाजपाचे लोक धर्माला शस्त्र बनवू पाहात आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललं आहे. तर डिंपल यादव यांनी हे म्हटलं आहे की मशिदीत आम्ही कुठलीही बैठक घेतलेली नाही. भाजपाला फक्त लोकांचं लक्ष्य दुसरीकडे केंद्रीत करायचं असतं. त्यामुळे असले मुद्दे समोर आणले जातात. सरकारमधले लोक ना ऑपरेशनची चर्चा करतात ना इतर कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्याची असंही या दोघांनी म्हटलं आहे.