रेखा यांच्या जागेवर अक्षयकुमार जाणार राज्यसभेवर ?

राज ठाकरे यांनी अक्षयकुमारला आधुनिक मनोजकुमारची उपमा दिली होती.

akshay kumar
Akshay Kumar: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अक्षयकुमारच्या कॅनडा नागरिकत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याला आधुनिक मनोजकुमारची उपमा दिली होती.

कला, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातून राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून नेमण्यात येणाऱ्या १२ पैकी तीन सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे हे तीनही खासदार मुंबईतून येतात. उद्योगपती अनु आगा, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना राष्ट्रपतींनी नियुक्त केले होते. आता त्यांच्या जागेवर नियुक्ती मिळवण्यासाठी चित्रपटसृष्टी आणि लेखकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु, सध्या अक्षयकुमारचे नाव यात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

सभागृहात सर्वांत कमी उपस्थिती असल्याचा विक्रम रेखा यांच्या नावे आहेत. त्या अवघ्या साडेचार टक्केच सभागृहात उपस्थित होत्या. त्यामुळे मोठ्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागले. रेखा यांच्या जागेवर चित्रपटसृष्टीतील कोणत्या कलाकाराला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेतील रिक्त जागेवर वर्णी लागावी म्हणून अनेकांनी पक्षाच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे, असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, सध्या तरी अक्षयकुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर सलमान खानचे वडील सलीम खान, विवेक ओबेरॉय याचे वडील सुरेश ओबेरॉय, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, वहिदा रहेमान, आशा पारेख, मधूर भांडारकर आणि अनुपम खेर यांची शिफारसही सरकारकडे गेल्याचे सांगण्यात येते.

महिलांसाठी शौचालय, पंतप्रधान स्वच्छता अभियान आणि शहीद जवानांसाठी निधी जमा करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन अक्षयकुमारने आपले देशप्रेम दाखवून दिले आहे. कॅनडाच्या त्याच्या नागरिकत्वाबाबत समस्या निर्माण झाली तर त्याच्या सासू डिंपल कपाडिया यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. विशेष म्हणजे यंदा पाडव्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अक्षयकुमारच्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याला आधुनिक मनोजकुमारची उपमा दिली होती.

दरम्यान, गजेंद्र चौहानवरही संघ परिवाराचा वरदहस्त आहे. चौहान यांना एफटीआयचे अध्यक्षपद दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हाही सरकार चौहान यांच्या मागे उभे राहिले होते. ईशान्य भारतात भाजपाच्या प्रचाराचे त्यांनी चांगले काम केल्याचे सांगण्यात येते. मोबाइल टॉवरच्या रेडिएशन विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन करणाऱ्या जुही चावला यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे पती जय मेहता हे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापैकी नक्की कोण राज्यसभेवर जाईल हे लवकरच स्पष्ट होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar in race of rajya sabha instead on actor rekhas place