Al Falah University Chairman Javed Ahmad Siddiqui Summoned: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अल फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष आणि संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी यांना समन्स बजावले आहे. १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटानंतर विद्यापीठ अनुदान आयोग आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने उघड केलेल्या कथित फसवणूक आणि अनियमिततेसंदर्भात त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
सूत्रांनी सांगितले की, जावेद सिद्दीकी यांना अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टच्या मान्यता आणि वित्तपुरवठ्याशी संबंधित कागदपत्रांसह गुन्हे शाखेसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अल फलाह चॅरिटेबल ट्रस्ट, अल फलाह मेडिकल रिसर्च फाउंडेशनसह नऊ संस्था चालवत होते, जिथे स्फोटातील आरोपी उमर नबी आणि मुझम्मिल गनई काम करत होते.
“त्यांना (सिद्दीकी) त्यांच्या फर्म, ट्रस्ट आणि युजीसी अंतर्गत विद्यापीठाच्या मान्यतेशी संबंधित सर्व नोंदी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. युजीसी कायद्याच्या कलम १२(ब) अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कायद्याचे कलम १२ आयोगाच्या अधिकार आणि कार्यांशी संबंधित आहे. नॅकने विद्यापीठाला नोटीस बजावल्यानंतर आणि त्यांची मान्यता रद्द करण्यात आल्याचे आणि त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा केल्यानंतर गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत.
नॅक ही यूजीसी अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे जी महाविद्यालये आणि विद्यापीठे यासारख्या उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करते आणि मान्यता देते. तसेच त्यांची गुणवत्ता तपासते. भारतीय विद्यापीठांच्या संघटनेने यापूर्वीच अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. त्यांना विद्यापीठाला त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून भारतीय विद्यापीठ संघटनेचे नाव आणि लोगो त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
जावेद अहमद सिद्दीकी कोण आहेत?
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जावेद सिद्दीकी हे मध्य प्रदेशचे आहेत. त्यांनी इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. ते १९९२ मध्ये अल फलाह इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक बनले आणि नंतर त्यांनी अल फलाह ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर त्यांचा व्यवसाय शिक्षण, सॉफ्टवेअर, वित्तीय सेवा आणि ऊर्जा क्षेत्रात विस्तारला. पण, यापैकी बहुतेक कंपन्या बंद पडल्या आहेत.
