द्रमुकचे कोषाध्यक्ष एम. के. स्टालिन हे केवळ तीन महिन्यांचे सोबती आहेत, असे अभद्र आणि धक्कादायक वक्तव्य स्टालिन यांचे ज्येष्ठ बंधू एम. के. अळगिरी यांनी केल्यानेच आपण अळगिरी यांच्यावर कठोर कारवाई केली, असे स्पष्टीकरण द्रमुकचे सर्वेसर्वा आणि या दोन्ही बंधूंचे पिता एम. करुणानिधी यांनी दिले आहे.
अळगिरी यांच्या मनात स्टालिनबद्दल अढी असून त्याचे कारण आपल्याला माहिती नाही. स्टालिन तीन महिन्यांचे सोबती आहेत, असे वक्तव्य अळगिरी यांनी केले. कोणताही पिता आपल्या पुत्राबद्दल असे वक्तव्य सहन करू शकत नाही, परंतु पक्षाध्यक्ष या नात्याने आपण ते सहन केले, असे करुणानिधी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अळगिरी २४ जानेवारी रोजी सकाळीच आपल्या घरी आले आणि त्यांनी स्टालिन यांच्याविरोधात अभद्र आणि धक्कादायक विधान केले. अळगिरी हे सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान आपल्या घरी आले, आपल्याला भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी पक्षप्रमुखाच्या घरी जाण्याची ही वेळ आहे का, असा सवालही करुणानिधी यांनी केला.
अळगिरी यांनी पक्षाच्या सर्वसाधारण आणि कार्यकारिणीच्या निर्णयाविरोधात वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनावश्यक राजकीय वाद चिघळला. स्टालिन यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासूनच ते गरळ ओकत आहेत. अळगिरी यांच्याविरुद्ध करण्यात आलेली कारवाई हा पक्षाचा निर्णय आहे, असेही करुणानिधी म्हणाले.
लेखी स्पष्टीकरण देण्याऐवजी मुलाखती देणे आणि पोस्टर्स लावणे कितपत योग्य आहे, असा सवालही करुणानिधी यांनी केला. केवळ भावाबाबतच नाही तर पक्षातील कोणत्याही सदस्याबाबतही तो पुढील तीन-चार महिन्यांचा सोबती आहे असे वक्तव्य आपल्यासमोर करणे कितपत योग्य आहे, कोणीही असे वक्तव्य सहन करणार नाही, असेही करुणानिधी म्हणाले.
अळगिरी यांनी माफी मागितली तर त्यांना निलंबित करण्याचा निर्णय मागे घेण्यात येईल का, असे विचारले असता करुणानिधी यांनी, त्याबाबत अळगिरी यांनाच विचारा, असे उत्तर दिले.
अळगिरी यांच्या काही समर्थकांनाही पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे करुणानिधी यांनी समर्थन केले. द्रमुकने एमडीएमकेशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला त्याविरोधात अळगिरी यांनी भूमिका मांडल्याने त्यांना २५ जानेवारी रोजी पक्षातून निलंबित करण्यात आले.