Albania Names AI Assistant Diella As Virtual Minister : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात एआयचं युग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याला इंटरनेटवर काही शोधायचं असो किंवा काही लिहायचं असो सगळीकडे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा (AI ) वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं. खरं तर तंत्रज्ञानाच्या या जगात अनेक गोष्टी फार वेगाने बदलत आहेत, एआयचा समावेश आता वेगवेगळ्या क्षेत्रांत वाढला आहे.
एवढंच नाही तर एआयने आता राजकारणातही प्रवेश केला आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण होय हे खरं आहे. कारण भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी एआय निर्मित मंत्री म्हणून अल्बेनिया या देशाने चक्क एआयला (AI ) मंत्रिपद दिलं आहे. अशा प्रकारे एआय निर्मित मंत्री म्हणून नियुक्ती करणारा अल्बेनिया हा पहिला देश ठरला आहे. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी गुरुवारी या संदर्भातील माहिती जाहीर केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
एडी रामा यांनी सांगितलं की सार्वजनिक निविदांचे निरीक्षण करण्यासाठी जगातील पहिले एआय निर्मित मंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संपूर्ण प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त करेल असं आश्वासन एडी रामा यांनी दिलं. दरम्यान, मे महिन्यात झालेल्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा करताना एडी रामा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात एका नव्या सदस्याला अर्थात डिएला (AI) स्थान दिलं. अल्बेनियन भाषेत डिएलाचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो. डिएला ही पहिली सरकारी सदस्य आहे, जी प्रत्यक्ष उपस्थित नाही. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करण्यात आलेली आहे.
डिएला जबाबदाऱ्या कशा पार पाडणार?
सार्वजनिक निविदांमध्ये डिएलाची भूमिका कशी असेल? याबाबत माहिती देताना पंतप्रधान एडी रामा यांनी सांगितलं की, “सार्वजनिक निविदांशी संबंधित डिएला सर्व निर्णयांचं व्यवस्थापन करेल आणि ते कामे १०० टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील. निविदा प्रक्रियेत सादर करण्यात आलेला प्रत्येक सार्वजनिक निधी पूर्णपणे पारदर्शक असेल याची खात्री करेल.”
?? Update:
— kos_data (@kos_data) September 11, 2025
AI Minister "Diella" could become Albania’s next prime minister.
In his "Albania 2030" presentation, PM Edi Rama expressed his wish for Albania to become the first country led by an AI government. https://t.co/vycBDblKlZ
जानेवारीमध्ये एआय सक्षम डिजिटल असिस्टंट म्हणून डिएला सादर करण्यात आलं होतं. डिएला ही पारंपारिक अल्बेनियन पोशाखात परिधान केलेल्या महिलेसारखी दिसण्यासाठी डिझाइन करण्यात आलेलं आहे. माहितीनुसार, डिएलाने आतापर्यंत ३६,६०० डिजिटल कागदपत्रे प्रसिद्ध करण्यास मदत केली आहे. तसेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे जवळजवळ १,००० पेक्षा जास्त सेवा दिल्या आहेत.
दरम्यान, अल्बेनियन स्थानिक माध्यमांनी डिएलाची नियुक्ती करण्यात आल्याच्या संदर्भात कौतुक केलं आहे. तसेच अल्बेनियन सरकार ज्या पद्धतीने प्रशासकीय शक्तीची कल्पना करत आहे आणि त्याचा योग्य उपयोग करत आहे, त्यामध्ये एक मोठं परिवर्तन होत असल्याचं वर्णन करण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाचा परिचय केवळ एक साधन म्हणून नाही तर प्रशासनात सक्रिय सहभागी म्हणून करण्यात येत असल्याने आता कौतुक होत आहे.