ओमिक्रॉन या करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात दहशत पसरली आहे. जगातील अनेक देश सतर्क आहेत. दरम्यान, भारतातही ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्राव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारही सतर्क झाले आहेत.कोविड-१९ चा नवीन प्रकार B.1.1529 या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी याचे वर्णन ‘वेरिएंट ऑफ कन्सर्न’ असे केले आहे. त्याला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. हा प्रकार करोनाच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन प्रकाराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ‘जोखीम’ असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा आणि १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ‘हॉटस्पॉट’ असलेल्या भागांवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

हॉटस्पॉट भागात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने तपासणीसाठी INSACOG लॅबमध्ये पाठवण्यास केंद्राने सांगितले आहे. राज्यांना लवकरात लवकर हॉटस्पॉट क्षेत्र ओळखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्यांना जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात आणि संसर्ग दर ५ टक्क्याच्या खाली ठेवण्याचा सल्ला केंद्राकडून देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देखील ‘ओमिक्रॉन’ भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना स्वामीनाथन यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि मास्क वापरण्यासाठी आवाहन केले आहे. मास्क “तुमच्या खिशातील लस” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वामीनाथन म्हणाल्या, “ओमिक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान-आधारित धोरणाची गरज आहे. सर्व वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे, कोणतेही बारीत लक्षणे दिसली तर बारकाईने निरीक्षण करणे, गरजेचे आहे. तसेच ‘ओमिक्रॉन’ बाबत शास्त्रज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे चिंता कमी होऊ शकते.”