Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली दोन काश्मिरी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीतून राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) हा दहशतवादी हल्ला करणारे तीनही जण पाकिस्तानी होते अशी माहिती मिळाली आहे.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बटकोटे, पहलगाम येथे परवेझ अहमद जोथार आणि हिल पार्क, पहलगाम येथील बशीर अहमद जोथार याच्या घरी गेले होते आणि दहशतवाद्यांकडून त्यांच्याकडून जेवण घेतले होते अशी माहिती समोर आली आहे. “चौकशीदरम्यान त्यांनी हल्ल्यात सहभाग असलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आणि ते लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले पाकिस्तानी नागरिक होते याची पुष्टी देखील केली,” असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.

वेगळी माहिती आली समोर

हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांच्या ओळखीबद्दल आधी जो समज होता त्यापेक्षा वेगळीच माहिती समोर आली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाल्याच्या दोन दिवसांनंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे तीन स्केच जारी केले होते. ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा, अली भाई उर्फ तल्हा आणि काश्मीरी नागरिक हुसेन ठोकर यांचा समावेश होता. एएनआय सुत्रांनी आता सांगितले आहे की, स्केच जारी करण्यात आले होते ते तिघेही पहलगाम येथे हल्ला करणारे नाहीत.

सूत्रांनी सांगितले की, हल्लेखोरांपैकी एक हा सुलेमान शाह असल्याचे मानले जात आहे, जो गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी श्रीनगर-सोनमर्ग महामार्गावर Z-Morh बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या ७ कर्मचार्‍यांच्या हत्येत सहभागी होता. त्याचा या हल्ल्यातील सहआरोपी जुनैद रमजान भट हा ४ डिसेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता.

त्याच्या फोनमधून पोलिसांनी जुनैदचा आणि इतर तीन दहशतवाद्यांचा फोटो जप्त केला होता. हा फोटो २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर व्हायरल झाला होता आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फोटोचा स्केचसाठी आधार घेण्यात आला होता.

“नवीन छायाचित्रे अनेक साक्षीदारांना दाखवण्यात आली आणि त्यांनीही घटनास्थळी त्यांची उपस्थिती पुष्टी केली. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आहेत, ज्यात झेड-मोर दहशतवादी आरोपी सुलेमान शाहचाही समावेश आहे,” असे एका सूत्राने सांगितले.

तपासादरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा आणि एनआयएने जुनैदच्या फोनमधून जप्त केलेले वेगवेगळे फोटो अटक केलेल्या दोन स्थानिकांना दाखवले , ज्यांनी पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवस आधी त्यांच्या घरी आलेल्या या लोकांना ओळखले. “नवीन फोटो अनेक वेगवेगळ्या साक्षीदारांना दाखवण्यात आले, आणि त्यांनी देखील गुन्हा घडला त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितिची पुष्टी केली आहे. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आहेत, ज्यात Z-Morh दहशतवादी घटनेतील आरोपी सुलेमान शाहचाही समावेश आहे,” असे एका सूत्राने सांगितले

केंद्रीय यंत्रणा आणि एनआयए हे जुनी प्रकरणे तपासत आहेत आणि बॅलेस्टिक रिपोर्ट जुळवून पाहत आहेत, जेणेकरून हल्लेखोरांविरोधात एक भक्कम खटला उभारता येईल,” असे सुत्रांनी सांगितले.

सुलेमान हा दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ मध्ये तीन लष्करी जवानांची हत्या आणि गेल्या वर्षी मे महिन्यात जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात हवाई दलाचा जवान ठार झाला होता त्या हल्ल्यात सहभागी होता का याचा तपासकर्त्यांकडून शोध घेतला जात आहे.

हल्लेखोरांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली दोन स्थानिकांना अटक करण्यापूर्वी, एनआयएने २०० हून अधिक लोकांची चौकशी केली होती. ज्यामध्ये पोनी ऑपरेटर, दुकानदार आणि फोटोग्राफर अशा अनेकांचा समावेश होता. “परवेझ याची एका पोनी ऑपरेटरबरोबर मैत्री होती आणि त्यांच्या बायकांमध्ये त्याच्या घरी आलेल्यांबद्दल बोलणं झालं होतं,” असे एका सुत्राने सांगितले.

एनआयएला असे वाटते की तिघेही हल्लेखोर २० एप्रिल रोजी संध्याकाळी उशिरा त्यांच्या घरी आले आणि त्यांना जेवण पॅक करण्यास सांगितले. तसेच जाण्यापूर्वी काही पैसे दिले आणि कोणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली.

“तपासानुसार, परवेझ आणि बशीर यांनी जाणीवपूर्वक तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हल्ल्यापूर्वी हिल पार्क येथील हंगामी ढोक (झोपडी) मध्ये आश्रय दिला होता,” असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. “या दोन व्यक्तींनी दहशतवाद्यांना जेवण, निवारा आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला,” अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.