‘घातपाती कारवायां’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठाविण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सने (आयएसआय) प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार रावळपिंडी येथील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हेरगिरीच्या आरोपाखाली बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी जाधव घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता. याशिवाय, मध्यंतरी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एका व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओत जाधव यांनी आपण भारतीय गुप्तहेर संस्था रॉ साठी काम करत असल्याची कबुली दिली होती. बलुचिस्तान व कराचीत अशांतता निर्माण करण्यासाठी रॉने आपल्याला तैनात केल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते. मात्र, या व्हिडिओत अनेक फेरफार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातील कलम ५९ आणि गोपनीयतेच्या कायद्यातील कलम ३ नुसार जाधव यांच्यावर खटला भरण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने कुलभूषण जाधव यांना राजदूतावासाशी संपर्क साधू देण्याची (कॉन्सुलर अ‍ॅक्सेस) विनंती पाकिस्तानकडे केली होती. मात्र, ही विनंती पाकिस्तानने फेटाळून लावली होती. भारताचे हेर असलेले कुलभूषण यांनी विशिष्ट कारणासाठी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना राजदूतावासाशी संपर्क साधण्याची संधी देता येणार नसल्याचे पाकने सांगितले होते.

मार्च महिन्यात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. मूळचे मुंबईचे असलेले कुलभूषण जाधव हे नौदलातील माजी अधिकारी आहेत. मुदतीपूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. जाधव यांना आमिष दाखवून बलुचिस्तानात नेण्यात आले होते. ते भारताचे नागरिक आहेत, पण ते गुप्तहेर नाहीत असे केंद्र सरकारचे म्हणणे होते. पण पाकिस्तान मात्र कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी तशी कबुलीही दिली होती. कुलभूषण जाधव प्रकरणातील कागदपत्रांवरुन त्यांच्याविरोधात ठोस पुरावा आढळलेला नाही असे अझीझ यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alleged indian spy kulbhushan jadhav given death sentence reports pak media quoting ispr
First published on: 10-04-2017 at 15:14 IST