परदेशांत गुप्तचर सेवा बजावणाऱ्या ‘रॉ’ (रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसिस विंग) या संस्थेच्या प्रमुखपदी ज्येष्ठ पोलीस अधिकारी अलोक जोशी (५९) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.
हरयाणा केडरचे १९७६ च्या तुकडीतील अधिकारी असलेले जोशी सध्या ‘रॉ’ मध्ये विशेष सचिव म्हणून काम पाहतात. ते आपल्या पदाची सूत्रे ३० डिसेंबरला हाती घेतील. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दोन वर्षे कालावधी असलेल्या या नियुक्तीला मंजुरी दिली. संजीव त्रिपाठी यांच्याकडून जोशी सूत्रे हाती घेतील. जोशी यांनी इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) या देशांतर्गत गुप्तचर सेवेसाठीही काम केले आहे. नेपाळ व पाकिस्तानातील कार्यवाहीची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर सेवांमधील अधिक समन्वयाची गरज भासत असून, जोशी यांनी या दोन्ही सेवांमध्ये काम केले आहे. आणखी एका नियुक्तीत आयबीमध्ये विशेष संचालक असलेल्या यशोवर्धन आझाद यांची सुरक्षा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे.