scorecardresearch

अमरनाथ यात्रा : केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रत्येक यात्रेकरूला ५ लाखांचं विमा कवच!

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून प्रत्येक भाविकाला विमा संरक्षण देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

amarnath yatra insurance for pilgrims
अमरनाथ यात्रेकरूंसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय गेतला आहे.

यंदाच्या अमरनाथ यात्रेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यात्रेबाबतच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यापैकी दोन बैठका या यात्रेची सुरक्षा आणि त्यासंदर्भातल्या व्यवस्थेबाबत होत्या तर तिसरी बैठक ही जम्मू-काश्मीरमधील सर्वसाधारण सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. यानंतर केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. तसेच, प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन अर्थात RFID टॅग दिले जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

पहिल्यांदाच यात्रेकरूंना मिळणार टॅग!

जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पहिल्यांदाच यात्रेकरूंना टॅग दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत हे आरएफआयडी टॅग फक्त वाहनांनाच दिले जात होते. यासोबतच, टेंट, वायफाय हॉटस्पॉट, पुरेशी प्रकाश व्यवस्था यासारख्या आवश्यक सोयी यात्रेकरूंच्या संपूर्ण मार्गात करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, बाबा बरफानींचं ऑनलाईन लाईव्ह दर्शन, अमरनाथ गुहेतील सकाळ आणि संध्याकाळच्या आरत्या याचं लाईव्ह दर्शन, बेस कॅम्पवर निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जाणार आहे.

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सज्ज!

अमरनाथ यात्रेमध्ये दहशतवादी कारवाया होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला परवानगी मिळाल्यामुळे यावेळी सुरक्षेसोबतच इतर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. याआधी ५ ऑगस्ट २०१९ला अमरनाथ यात्रा झाली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनंतर म्हणजेच ३० जून पासून यात्रेला सुरुवात होत आहे.

तब्बल ६ हजार फुटांवरच्या वातावरणात पुरेशा ऑक्सिजन सिलिंडर्ससोबतच मेडिकल बेड्स, रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता ही काळजी घेण्यात आली आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात यावी, असे निर्देश देखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amarnath yatra amit shah announce 5 lakh insurance for each pilgrimage pmw