सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात रामबन जिल्ह्य़ात चार निदर्शकांचा मृत्यू झाल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. काश्मीरमध्ये गंदरबल जिल्ह्य़ात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले.
गुरुवारच्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यात तणावाचे वातावरण आहे. काश्मीरमधील सर्व प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, नवा जथ्था पाठवण्यात आलेला नाही. गोळीबाराची घटना घडलेल्या रामबन जिल्ह्य़ात संचारबंदी आहे.
सीमा सुरक्षा आणि राज्य पोलिसांच्या विरोधात तीन प्रथमदर्शी तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आल्याचे जम्मूचे पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्य़ात दगडफेक करणाऱ्या निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला गोळीबार करावा लागला यामध्ये दोन जण जखमी झाले. मोठय़ा संख्येने निदर्शक जमल्याने सुरक्षा दलाला जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच गोळीबार करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात दोन जण जखमी झाले.
सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये श्रीनगरसह काश्मीरच्या अनेक भागांत चकमक घडली. डोडा जिल्ह्य़ात निदर्शक हिंसक झाल्याने पोलिसांना पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करावा लागला. जम्मूतील भंदेरवाह, बनिहल, थट्री, किश्तवार, गुल संगलडन भागात निदर्शने झाली. दरम्यान फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सने तीन दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे.
धरम छावणी पोलिसांकडे
गोळीबाराच्या घटनेनंतर सीमा सुरक्षा दलाने रामबन जिल्ह्य़ातील धरम छावणी रिकामी करून पोलिसांकडे सुपूर्द केली. गोळीबाराच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती कठोरपणे हाताळत असल्याचा आरोप करत जमावाने सीमा सुरक्षा दलाच्या तळावर हल्ला केला होता. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल सीमा सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात चार जण ठार तर ४४ जण जखमी झाले होते. जमावाने दगडफेक केल्याने अनेक जवान जखमी झाले होते.