परराष्ट्रमंत्री टिलरसन आणि संयुक्त राष्ट्रांतील दूत हॅले यांची परस्परविरोधी वक्तव्ये

सीरियातील संघर्षांबाबत अमेरिकेची नेमकी काय भूमिका आहे याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांनी त्यांच्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्रांनिशी केलेल्या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर म्हणून अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनातील नेते व अधिकारी जी परस्परविरोधी वक्तव्ये करत आहेत त्यातून हेच स्पष्ट होत आहे.

असाद सत्तेत असताना सीरियात शांतता प्रस्थापित होण्याची काहीही शक्यता नाही. ते असताना राजनैतिक तोडगा निघण्याची सुतराम शक्यता नाही. सीरियामध्ये सत्तांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत निक्की हॅले यांनी सीएनएनचे पत्रकार जेक टॅपर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

[jwplayer RysYVizT]

तर अमेरिकेचे पराराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी एबीसी न्यूजच्या जॉर्ज स्टीफनोपोलस यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अमेरिकेने गुरुवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा संबंध केवळ सीरियाने केलेल्या रासायनिक हल्ल्याशी आहे. सीरियाचे अध्यक्ष असाद आणि त्यांचे समर्थन करणारी रशिया यांना अमेरिका रासायनिक हल्ला खपवून घेणार नाही हा संदेश देणे एवढाच त्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा उद्देश होता. त्याशिवाय अमेरिकेच्या लष्करी धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असे टिलरसन म्हणाले.

हॅले यांनी यापूर्वीच्या त्यांच्याच वक्तव्याच्या विरोधातील भाष्य आता केले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, असाद यांना सत्तेतून हटवणे याला अमेरिकी धोरणात प्राधान्य नाही. त्याच वेळी टिलरसन यांनीही म्हटले होते की, सीरियाचे नागरिकच असाद यांचे भवितव्य ठरवतील. आता मात्र त्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे ट्रम्प प्रशासनात सीरिया प्रश्नावरून संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

सीरियाला रासायनिक हल्ले करण्यापासून रोखण्यात रशिया अयशस्वी झाला आहे, असे टिलरसन म्हणाले. टिलरसन या आठवडय़ात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते रशियाच्या प्रतिनिधींना असाद यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्यास सुचवण्याची शक्यता आहे.

[jwplayer RysYVizT]