पीटीआय, हैदराबाद

भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. आरमुर येथे प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले की, ‘‘आपल्याविरुद्ध कोणतीही कारवाई होणार नाही, या भ्रमात त्यांनी राहू नये. भाजप तेलंगणमध्ये सत्तेवर आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल आणि दोषी ठरणाऱ्यांना कारावासात पाठवले जाईल.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या भाषणात शहा म्हणाले की, हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून ‘केसीआर’ यांना असे वाटत आहे की, त्यांच्याविरुद्ध काहीही होणार नाही. त्यांनी या प्रकरणी भ्रमात राहू नये. त्यांची घटका भरत आली आहे. या सर्व घोटाळय़ांची भाजप सरकारकडून चौकशी केली जाईल आणि दोषी ठरणाऱ्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल. भ्रष्टाचारात ‘केसीआर’ सरकारने कोणताही विधिनिषेध ठेवलेला नाही. ‘मियांपूर जमीन घोटाळा’, ‘कविताजी यांचा मद्य घोटाळा’ ‘बाह्यवळण रस्ता घोटाळा’ आदींचा उल्लेख शहा यांनी यावेळी केला. तेलंगणमध्ये भाजप सत्तेवर आल्यास मुस्लिमांसाठीचा चार टक्के आरक्षित वाटा (कोटा) रद्द करण्यात येईल. त्याचा लाभ इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अनुसूचित जमातींना देण्यात येईल. तसेच अयोध्या येथील राममंदिराच्या दर्शनासाठी मोफत अयोध्या वारी करण्याचे आश्वासनही शहा यांनी यावेळी दिले.