पीटीआय, नवी दिल्ली
“संसद किंवा विधानसभा या वाद-विवाद आणि चर्चेसाठी असतात, पण क्षुद्र राजकीय फायद्यांसाठी विरोधाच्या नावाखाली सभागृहांचे कामकाज सातत्याने अडवून धरणे योग्य नाही,” असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केले. दिल्ली विधानसभेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय सभागृह अध्यक्ष परिषदे’त बोलताना शहा यांनी विरोधकांच्या सभागृहांतील वर्तनाबद्दल नापसंती दर्शवली.

नुकत्याच समाप्त झालेल्या, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी मुख्यतः ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणला. त्यामुळे साधारण महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेत केवळ ३८ तास कामकाज होऊ शकले. संसदेत मर्यादित वाद-विवाद किंवा चर्चा होतात तेव्हा राष्ट्र-उभारणीत सभागृहांच्या योगदानावर परिणाम होतो, असे मत शहा यांनी व्यक्त केले.

सर्व चर्चा अर्थपूर्ण असायला हव्यात आणि प्रत्येकाने सभागृह अध्यक्षांच्या पदाची प्रतिष्ठा आणि आदर उंचावण्यासाठी काम केले पाहिजे असे आवाहनही शहा यांनी केले.

लोकशाहीमध्ये वाद-विवाद झालेच पाहिजे. विरोध नेहमी संयमी असायला हवा. पण विरोधाच्या नावाखाली दिवसेंदिवस सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नसेल तर ते चांगले नाही. देशाला यावर विचार करायला लागेल. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री