नवी दिल्ली : सत्ताधारी ‘एनडीए’च्या घटक पक्षांमधील मतभेद मिटवण्यात भाजपचे सर्वेसर्वा अमित शहांनी केलेली यशस्वी मध्यस्थी हे बिहारमधील अभूतपूर्व विजयातील प्रमुख कारण मानले जात आहे. त्याउलट, विरोधकांच्या ‘महागठबंधन’मध्ये जागावाटपांसाठी अखेरपर्यंत सुरू राहिलेली रस्सीखेच काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांच्यासारख्या दिग्गजांनाही थांबवता आली नाही. ही दोन्ही आघाड्यांमधील विसंगतीच बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून येते.
‘एनडीए’च्या जागावाटपामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पडती बाजू घ्यावी, असे भाजपचे प्रयत्न होते. स्वत:ला ‘मोदींचे हनुमान’ म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला जास्त जागा देण्याच्या भाजपच्या निर्णयावर नितीश नाराज होते. नितीश यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यातही मोदी-शहांनी कुचराई केली होती. परिणामी, नितीश कुमार यांनी आपल्या जनता दल (सं) पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपविरोधात संताप व्यक्त केला होता. शिवाय, आपल्याच पक्षातील काही नेते भाजपच्या नेत्यांच्या कच्छपी लागल्याची शंका आल्याने निवडणुकीचा सगळा कारभार नितीश कुमार यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. नितीश कुमार बधणार नाहीत हे लक्षात आल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्यात आले, त्यांनी नितीश कुमार यांच्याशी ४०-५० मिनिटे चर्चा केली.
गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केले जात होते. इथेही अमित शहांना भूपेंद्र पटेल यांनाच बदलायचे होते पण, ते शक्य झाले नाही असे सांगितले जाते. गुजरातऐवजी बिहारला प्राधान्य देऊन अमित शहांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ‘एनडीए’तील वातावरण बदलले. बिहारमधील अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान तसेच, भाजपचे प्रदेश नेते सम्राट चौधरी आदींनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले. ही भाजपने नितीश कुमार यांच्याशी केलेली मोठी तडजोड होती. चिराग पासवान यांना भाजपने पाठीशी घातले असले तरी, नितीश कुमार यांच्या पक्षाला धोका पोहोचणार नाही याची दक्षता भाजपने घेतली असे निकालावरून तरी दिसते. चिराग पासवान यांच्या जनलोकशक्ती पक्षाने २९ पैकी वीसहून अधिक जागा जिंकल्या हे ‘एनडीए’तील मतभेद दूर झाल्यामुळेच शक्य झाले. अमित शहांनी ‘एनडीए’ला किमान १६० जागा मिळतील असे भाकीत केले होते, ते खरे ठरले!
