Amit Shah vs KC Venugopal on Removal of Jailed PM CMs Bill : सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२० ऑगस्ट) लोकसभेत १३० वे घटनादुरूस्ती विधेयक सादर केलं. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) सलग ३० दिवस तुरुंगात असल्यास पंतप्रधानांपासून, मुख्यमंत्री व मंत्र्यांपर्यंत कोणालाही पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकात करण्यात आली आहे. मात्र, या विधेयकास विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.

अमित शाह यांनी हे विधेयक सादर करताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला. तर, काही खासदारांनी या विधेयकाच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने फेकल्या आणि निषेध नोंदवला. परिणामी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज स्थगित केलं.

के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून शाहांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न

तत्पूर्वी काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी अमित शाह यांना यापूर्वी झालेल्या अटकेची आठवण करून देत शाहांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. के. सी. वेणूगोपाल म्हणाले, “हे विधेयक सादर केल्यानंतर भाजपावाले लोकांना नैतिकतेच्या गोष्टी सांगू लागले आहेत. मात्र, आम्हाला नैतिकता शिकवू पाहणारे अमित शाह गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांना अटक झाली होती. ती गोष्ट विसरून कशी चालेल?”

अमित शाहांचं जशास तसं उत्तर

वेणुगोपाल यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले, “मी काय म्हणतोय ते ऐका. लोकसभेच्या रेकॉर्डवर चुकीच्या गोष्टी येऊ नयेत म्हणून सांगतोय. माझ्यावर खोटे आरोप झाले होते. त्यानंतर मला अटक झाली. मात्र, अटक होण्याआधीच मी नैतिकतेची मूल्ये जोपासत माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच न्यायालयाने मला निर्दोष जाहीर करेपर्यंत मी कुठलंही संवैधानिक पद स्वीकारलं नाही. हे लोक (विरोधक) आता आम्हाला नैतिकत शिकवणार का? मी तर राजीनामा देऊन तुरुंगात गेलो होतो.”

अमित शाह हे २००२ ते २०१० पर्यंत गुजरातमधील नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते. मात्र, २०१० मध्ये सोहराबुद्दीन शेख कथित चकमक प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेचा दाखला देत वेणुगोपाल यांनी शाह यांच्यावर टीका केली.