पीटीआय, हैदराबाद

‘‘केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्येकडील बंडखोरी व दहशतवादासह नक्षलवादावरही नियंत्रण ठेवण्यात मोठय़ा प्रमाणावर यशस्वी ठरले आहे,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे केला.येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) प्रशिक्षणार्थीच्या ७४ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना शहा बोलत होते. ते म्हणाले, की केंद्र सरकारच्या इतर यंत्रणांशी देशातील पोलीस दल प्रभावी समन्वय साधत आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) विरोधात एकाच दिवसात देशभरात पोलीस दलांनी यशस्वी मोहीम राबवली. राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत लक्षणीय घट झाली आहे. ईशान्येतील बंडखोर संघटनांसोबत शांतता करारानंतर आठ हजारांहून अधिक बंडखोरांना मुख्य प्रवाहात आणले गेले. ईशान्येत राज्यांतील सीमा विवाद सोडवून विकासात्मक कामांनी शांतता प्रस्थापित होऊन विकासाचे एक नवीन युग सुरू झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नक्षलग्रस्त जिल्हे ९६ वरून ४६ वर
शहा म्हणाले की, नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या २०१० मध्ये ९६ होती. ती ४६ पर्यंत घटवली आहे. दहशतवादाबाबत अजिबात दयामाया न दाखवण्याचे धोरण, दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळे दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. या आव्हानात्मक काळात ३६ हजारांहून अधिक पोलिसांनी आपल्या प्राणांचे मोल दिले.