‘ऑपरेशन ब्ल्यू-स्टार’ कारवाईच्या ३० व्या वर्षांचे निमित्त साधून दल खालसा या शीख संघटनेने येत्या ६ जून रोजी ‘अमृतसर बंद’ चे आवाहन केले आहे.
संघटनेच्या कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दल खालसाचे प्रवक्ते कन्वरपालसिंग यांनी ही माहिती दिली. सुवर्ण मंदिरावर त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईप्रसंगी शेकडो निरपराध भाविकांना या दिवशी ठार मारण्यात आले. म्हणून आम्ही बंदचे आवाहन केले आहे. १९८४ मध्ये झालेल्या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या असून शीख समुदाय त्याबद्दल कधीही माफ करणार नाही, हा संदेश सरकारला देण्यासाठीच लोकांनी हा बंद शांततेने पाळावा, असेही आवाहन कन्वरपालसिंग यांनी केले.
हा बंद औद्योगिक आस्थापनांसाठी असून शैक्षणिक संस्था तसेच वाहतूक व्यवस्था नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पाच जून रोजी लोकांचा एक मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.