देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रॅण्ड असलेल्या अमूलची मूळ कंपनी गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटींग फेडरेशनने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विक्रमी ३९ हजार २४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या अगोदच्या आर्थिक वर्षात कंपनीची एकूण उलाढाल ३८ हजार २४८ कोटी रुपये होती. कोविड महामारीमुळे हॉटेल व रेस्टॉरंटमधील विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र घरगुती वापराच्या पदार्थांवर अधिक भर देत आणि महामारीतही शेवटापर्यंत पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रीत करून अमूलने आपल्या दूध, चीज, बटर आणि आईस्क्रम या पदार्थांच्या विक्रीत ८.१ टक्क्यांची वाढ नोंदवली.

‘जीसीएमएमएफ’ने आपल्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सांगितले की, अमूल ग्रुपच्या एकूण उलाढालीने ५३ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच, जीसीएमएमएफ ने वर्ष २०२५ पर्यंत ग्रुपची उलाढाल १ लाख कोटी रुपयांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जीसीएमएमएफचे एमडी आरएस सोढी यांनी म्हटले आहे की, महामारीच्या काळात आम्ही घरगुती वापरातील पदार्थ वाढवण्यावर भर दिला. आम्ही ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आमच्या मार्केटींगच्या पद्धतीत बदल केला, त्यांना घरीच रेस्टॉरंटसारखी डीश बनवण्यासाठी आमच्या पदार्थांचा कसा उपयोग होतो, हे पटवून दिले.