भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातल्या गावामध्ये त्यांच्या राहत्या घरातून हे अपहरण करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र शनिवारी सकाळी भारतीय संरक्षण मंत्रालयाने ट्विट करुन अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.


एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जवान मोहम्मद यासीन हे भारतीय लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत. बडगाम जिल्ह्यातील क्वाझिपोरा चाडुरा गावचे ते रहिवासी आहेत. शुक्रवारी काही दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि ते यासीन यांना आपल्यासोबत घेऊन गेले, अशी तक्रार या जवानाच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली आहे. यासीन हे २६ फेब्रुवारी रोजी सुट्टीवर आपल्या घरी परतले होते.

जवानाच्या अपहरणाची पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ शोध पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि इतर सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे, नेमके याच काळात हे अपहरण घ़डले आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास ट्विट करुन जवानाचे अपहरण झाल्याचे वृत्त फेटाळले असून काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.