पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून एका राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) कमांडोने आत्महत्या केल्याची घटना हरयाणातील मानेसर येथील एनएसजी कॅम्पमध्ये घडली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://twitter.com/ANI/status/937941676072374273
पोलिसांच्या माहितीनुसार, एनएसजीमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) असणारे जितेंदरकुमार हे मानेसर येथील कॅम्पमध्ये राहत होते. त्यांनी गेल्या गुरुवारी पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

कमांडो जितेंदरकुमार हे मुळचे सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) अधिकारी होते. त्यांची मानेसर येथे डेप्युटेशनवर बदली झाली होती. मुळचे कानपूर (यूपी) रहिवासी असणाऱ्या या अधिकाऱ्याने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या पत्नी आणि मेहुणीला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघीही यातून बचावल्या असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मानेसरचे एसीपी धरमवीर सिंग यांनी ही माहिती दिली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.