बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री सुमिता सन्याल यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. पण, हिंदीत त्या नावाजल्या गेल्या होत्या ते म्हणजे ‘आनंद’ या चित्रपटामुळे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून सुमिता प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘रेणू’ ही भूमिका अनेकांच्या मनात घर करुन गेली होती.
सुमिता सन्याल यांचं खरं नाव मंजुळा सन्याल असून त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ ला दार्जिलिंगमध्ये झाला होता. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून त्यात बंगाली चित्रपटांचं प्रमाण जास्त आहे. ‘कुहेली’, ‘आशिर्वाद’, ‘गुड्डी’, ‘मेरे अपने’ या चित्रपटांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. हिंदी चित्रपट आणि नाटकांसोबतच मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.
Veteran actress Sumita Sanyal passes away at 71.
— ANI (@ANI) July 9, 2017