अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला इडा चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. नद्यानाले भरून वाहत असून पुरामध्ये आतापर्यंत ४५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. न्यूयॉर्कमध्ये पुरामुळे अत्यंत भीषण स्थिती असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रादेखील न्यूयॉर्कमध्ये असून वादळ आणि पुरामुळे अडकले आहेत. दरम्यान आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं असून न्यूयॉर्कमधील परिस्थितीची तुलना मुंबईशी केली आहे.

Photos: पावसामुळे मुंबईप्रमाणेच न्यूयॉर्क शहराची उडाली दाणादाण

आनंद महिंद्रा यांनी हवामान बदलावर भाष्य करताना एरव्ही मुंबईत असताना जगभरातून मला फोन करुन पूरसदृश्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करायचे, मात्र आता मी न्यूयॉर्कमध्ये आहे आणि भारतातून फोन येत असल्याचं म्हटलं आहे.

“मला आठवतं जेव्हा मुंबईत पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा मला जगभरातील मित्र फोन करुन चिंता व्यक्त करायचे आणि सुरक्षित आहात की नाही अशी विचारणा करायचे. पण आता मी न्यूयॉर्कमध्ये आहे आणि भारतातून तुम्ही सुरक्षित आहात ना अशी चौकशी करणारे फोन येत आहेत,” असं आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमेरिकेत वादळाचे ४५ बळी

इडा या चक्रीवादळाने घडवलेल्या विध्वंसाचे खरे दर्शन गुरुवारी झाले. या भागात विक्रमी पाऊस झाला असून घरे व मोटारीतील किमान चाळीस जण बुडाले. मेरीलँड ते कनेक्टीकट या भागात बुधवारी रात्री वादळाने थैमान घातले. गुरुवारीही ते चालूच राहिले. न्यूजर्सीमध्ये किमान २३ जण मरण पावले असून डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर फिल मर्फा यांनी हानीची ही माहिती दिली. न्यूयॉर्क शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे किमान १३ जण मरण पावले असून त्यातील ११ जण कमी उंचीच्या अपार्टमेंटमध्ये पाणी घुसल्याने मरण पावले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रहिवाशांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. न्यूयॉर्कच्या महामार्गावर पाचशे वाहने वाहून आलेली दिसली. रस्त्यांवर कचरा व मातीचा डोंगर झाला होता. काही बोगद्यांमध्ये १७ रेल्वेगाड्या अडकून पडल्या होत्या.