जिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी

जमावाने पोलिसांची गाडी आणि एका शैक्षणिक संस्थेच्या बसलाही आग लावली

Andhra Ministers House Set On Fire After District Is Renamed
जमावाने पोलिसांची गाडी आणि एका शैक्षणिक संस्थेच्या बसलाही आग लावली

आंध्र प्रदेशातील अमलापूरम शहरात संतप्त आंदोलकांना मंत्र्यांचं घर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने राज्याचे वाहतूक मंत्री पी विश्वरुप यांच्या घरावर हल्ला करत ते पेटवून दिलं. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

याशिवाय जमावाने पोलिसांची गाडी आणि एका शैक्षणिक संस्थेच्या बसलाही आग लावली आहे. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर अमलापूरममध्ये जमावबंदी लावण्यात आली आहे. याशिवाय आसपासच्या जिल्ह्यांमधून ५०० अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेवर नाराजी जाहीर केली आहे. आंबेडकरांच्या नावाचा समावेश होत असल्याने अभिमान वाटण्याऐवजी काही समाजविरोधी घटक हिंसाचार घडवत असून वाहनांना आग लावत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“२० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत हे फार दुर्दैवी आहे. आम्ही पूर्ण चौकशी करु आणि दोषी आढळणाऱ्यांना कडक शिक्षा देऊ,” असं त्यांनी सांगितलं आहे. यामागे काही राजकीय पक्ष आणि समाजघातक घटक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

४ एप्रिल रोजी कोनसीमा जिल्हा तयार करण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कोनसीमा साधना समितीने यावर आक्षेप घेतला. मंगळवारी समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलं आणि जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांच्याकडे निवेदन देण्यात आलं. पोलिसांनी आंदोलन थांबवण्याचं प्रयत्न केला असता आंदोलक संतप्त झाले आणि हिंसाचार घडला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Andhra ministers house set on fire after district is renamed sgy

Next Story
ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”
फोटो गॅलरी