आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपावर कमालीचे नाराज असून भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाही. आता नायडू यांनी विधानसभेची नवीन इमारत ही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच बांधण्याचा निर्णय घेतला आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात उंच बांधकाम ठरणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद करुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता चंद्राबाबू नायडू यांनी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पेक्षा उंच इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथे विधानसभेची नवीन इमारत बांधली जाणार असून याची उंची २५० मीटर इतकी असणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची उंची १८२ मीटर असून जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून याची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नायडू यांनी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

नोव्हेंबरच्या अखेरीस यासंदर्भातील निविदा काढण्यात येतील आणि यानंतर दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असेल. या इमारतीत दोन गॅलरी असतील. यातील पहिली गॅलरी ही ८० मीटरवर असेल. तिथे ३०० लोकांना उभं राहता येईल. तर दुसरी गॅलरी ही २५० मीटर उंचीवर असेल. तिथे २० लोकांना थांबता येईल. या दोन्ही गॅलरीमधून अमरावतीचे विहंगमय दृष्य दिसेल.