खासदार वरूण गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आज(शनिवार) पुन्हा एकदा ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेशमधील शेतकरी समोध सिंह १५ दिवसांपासून आपले धान्य विक्रीसाठी भटकत होते. मात्र धान्याची विक्री झाली नाही. अखेर त्यांनी स्वतः आपल्या धान्याला आग लावली. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठं आणून उभा केलं आहे.? कृषी धोरणाचा पुनर्विचार करणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे.” वरूण गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत शेतकरी एका बाजार समितीच्या आवारात धान्य पेटवत असतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

मागील काही दिवसांपासून वरूण गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सातात्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. मुजफ्फरनगर येथे कृषी कायद्याविरोधात झालेल्या महापंचायतीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना आपलंच रक्त असल्याचं म्हणत सहानुभुतीपूर्वक त्यांच्या समस्या ऐकण्याचं आणि सोडवण्याबद्दल ट्विट केलं होतं. तर, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीद देखील म्हटलं होतं.

याचबरोबर, उत्तर प्रदेशला पुराचा फटका बसला असून, राज्यातील अनेक जिल्हे पाण्याखाली आहेत. लोकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक गावं पूर्णतः पाण्याखाली असून लोकांना अन्न आणि पाणीदेखील मिळत नसल्याचं समोर आलं. पीलीभीत, बरखेडा, बीसलपुर, पूरनपुर आणि बहेडी भागात शेतमाल नष्ट झाला. या शेतकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी देखील खासदार वरुण गांधी सरसावले होते. त्यांनी पुराचा फटका बसलेल्या लोकांना राशन पुरवलं.

“…तर मग सरकार काय कामाचं?;” भाजपा खासदार वरुण गांधींचा योगी आदित्यनाथांना सवाल

तसेच, “तराईच्या बऱ्याच भागाला पुराचा फटका बसला आहे, त्यामुळे परिस्थिती खराब आहे. हे नैसर्गिक संकट संपेपर्यंत कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हाताने कोरडे रेशन दान करतोय. जेव्हा सर्वसामान्य माणसाला सरकारच्या मदतीची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा त्याला स्वतःच आपला बचाव करावा लागतो, मदत शोधावी लागते हे वेदनादायी आहे. जर सर्व त्यानेच करायचं असेल तर मग सरकार काय कामाचं?,” असा सवाल वरुण गांधी यांनी योगी सरकारला केला होता.