सोलापूर जिल्ह्यातील एका गावात सुरू असलेल्या मुरूम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी एक तरूण महिला आयपीएस अधिकारी पोहोचतात, त्यानंतर तेथील शेतकरी कारवाई रोखण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन फिरवतात. कार्यकर्त्याच्या फोनवरून अजित पवार आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई रोखण्याचे तोंडी आदेश देतात… मात्र तरूण महिला आयपीएस अधिकारी दुसऱ्याच्या नाही तर माझ्या फोनवर संपर्क करायला हवा होता, असे सांगतात. चित्रपटात शोभावा असा प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडला. दरम्यान आता या प्रकरणी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. सदर कारवाई रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावला. यावेळी फोनवर बोलत असताना आयपीएस अंजना कृष्णा यांनी मला दुसऱ्यांच्या फोनवर नाही तर माझ्या फोनवर संपर्क साधायला हवा होता, असे थेट अजित पवारांना सांगितले. यानंतर संतापलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांचा मोबाइल नंबर मागितला आणि त्यांना व्हिडीओ कॉल केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून अजित पवार तरूण महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापत असल्याचे ऐकू येत आहे. थेट उपमुख्यमंत्र्याला न ओळखण्याची तुमची हिंमत कशी झाली? असेही अजित पवार सुनावताना दिसतात. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर त्यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश अंजना कृष्णा यांना दिले.

अंजना २०२३ च्या बॅचच्या अधिकारी आहेत

अंजना कृष्णा २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. अंजना कृष्णा मुळच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील आहेत. अंजना कृष्णा यांचे वडील बिजू हे कपड्यांचे छोटेसे दुकान चालवतात. तर त्यांची आई सीमा या न्यायालयात टायपिस्ट आहेत. आता या सगळ्यानंतर अंजना कृष्णा यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अंजना कृष्णा यांचे वडील?

जे काही घडलं त्यामुळे अंजनाची बरीच चर्चा झाली. पण ती शांत आहे आणि खुश आहे. ऑफिसमध्ये काय घडलं, ड्युटीवर असताना काय घडलं ते ती आम्हाला मुळीच सांगत नाही. पण या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर झाली त्यामुळे आम्हाला कळलं. अंजनाने जे धाडस दाखवलं त्यानंतर मला अभिनंदनाचे इतके फोन आले की मी भारावून गेलो. अंजनाचा बाबा असल्याचा मला अभिमान वाटतो. प्रत्येकजण माझ्या मुलीबाबत आनंदाने बोलतो आहे आणि तिच्या धाडसाचं कौतुक करतो आहे. ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पदच आहे. असंही अंजना यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.