गाझा : गाझा पट्टीतील सर्वात मोठय़ा ‘अल-शिफा’ रुग्णालयातून नवजात बालकांना दुसरीकडे हलवल्यानंतर इस्रायली फौजांनी सोमवारी आपला मोर्चा उत्तर गाझातील इंडोनेशियन रुग्णालयाकडे वळवला. इस्रायलच्या रणगाडय़ांनी या रुग्णालयाला वेढा दिला आहे. यावेळी रुग्णालयाच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

गाझामध्ये तात्पुरता विराम घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर धुमश्चक्रीची तीव्रता अधिक वाढली आहे. इस्रायलच्या लष्करातर्फे रुग्णालयाबाहेरील परिस्थितीविषयी कोणतीही तातडीची टिप्पणी करण्यात आलेली नाही. या रुग्णालयात ७०० रुग्ण आणि कर्मचारी असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तसेच सामान्य युद्धग्रस्त नागरिकांनी तेथे आश्रय घेतला आहे. आपण हमासच्या दहशतवादी केंद्राला लक्ष्य केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे, तर रुग्णालयात कोणतेही सशस्त्र अतिरेकी नाहीत असा खुलासा प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा >>> चार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे वृत्त खोटे! चर्चेत राहण्याचा भाजपचा प्रयत्न, काँग्रेसची टीका

इस्रायलचे लष्कर उत्तर गाझामधील जबालिया निर्वासित छावणीवर इस्रायलने वारंवार केलेल्या बॉम्बहल्ल्यांमध्ये अनेक सामान्य पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, तिथे मोठय़ा प्रमाणात दहशतवादी असल्याचा इस्रायलचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे अपहरण

जेरुसलेम : येमेनमधील हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात इस्रायलशी संबंधित आणि भारताकडे येणाऱ्या गॅलॅक्सी लीडर या मालवाहू जहाजाचे अपहरण केले असून त्यावरील २५ कर्मचाऱ्यांना ओलीस धरले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे कर्मचारी फिलिपाईन्स, बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन व मेक्सिकोमधील आहेत. इस्रायल युद्ध संपवत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय हद्दीतील जहाजांना लक्ष्य करत राहू, अशी धमकी बंडखोरांनी दिली आहे.