अरुणाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या अंशु जामसेन्पा हीने एक जागतिक विक्रम नोंदवून भारताची मान पुन्हा उंचावली आहे. जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर तिने ५ दिवसात २ वेळा चढाई करुन या गौरवावर आपले नाव कोरले आहे. अशाप्रकारे विक्रम करुन तिने महिला कुठेही कमी नाहीत हे दाखवून देत एक अनोखा इतिहास रचला.

अंशुने रविवारी सकाळी ७.४५ वाजता आपली पाचवी चढाई पुर्ण करुन एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला. अशाप्रकारचा विक्रम करणारी अंशु पहिली भारतीय महिला आहे. आतापर्यंत तिने जगातील सर्वोच्च शिखर पाचव्यांदा चढून पुर्ण केले आहे. आतापर्यंत एव्हरेस्ट शिखर चढण्याचे अनेक विक्रम भारतीय तसेच परदेशी गिर्यारोहकांकडून कऱण्यात आले आहेत. मात्र तिने केलेला विक्रम या सगळ्यांहून वेगळा ठरला.

तिच्या या यशाबाबत बोलताना ‘ड्रीम हिमालया अॅडव्हेंचर’चे प्रबंधन निर्देशक एस. लामा म्हणाले, अशाप्रकारचा अनोखा विक्रम करणारी अंशु ही भारतातील पहिली महिला आहे. २०११ मध्ये अंशुनेच १० दिवसांमध्ये हे सर्वोच्च शिखर पार केले होते. फुरी शेरपा यांनी तिला या चढाईमध्ये साथ दिल्याचे तिने सांगितले.

पुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा यशस्वी चढाई केली आहे. दोन्ही बाजुंनी एव्हरेस्ट सर करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक आहेत. मागील ७ वर्षांपासून गिर्यारोहणाचा छंद जोपासणारे धनकुडे यांनी ही कामगिरी केली आहे. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिशेने म्हणजे चिनच्या दिशेने एव्हरेस्ट शिखर सर कलं होतं. तर आता त्यांनी दक्षिणेकडून म्हणेज नेपाळमधून एव्हरेस्ट शिखर सर केले.