पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवडय़ात केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपनेही बुधवारी याला ‘चोर मचाये शोर’ असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच रायबरेली, वायनाड, डायमंड हार्बर आणि कन्नौज लोकसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, अभिषेक बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांना खासदारपदाचा राजीनामा देण्याचे आवाहन केले.

भाजप मुख्यालयात माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकून यांनी पत्रकार परिषद घेतविरोधी पक्षांचे नेते प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघांमधील मतदार यादीचे विश्लेषण केले. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक नेत्यांवरही ठाकूर यांनी टीका केली.बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या आणि इतर राज्यांमध्ये सुरू होणाऱ्या मतदार यादीच्या एसआयआर विरोधात चुकीचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, ठाकूर यांनी जाहीर केलेल्या पाच-सहा लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी पहा. आम्हाला फक्त एका विधानसभेची आकडेवारी मिळवताना सहा महिने लागले. यावरून भाजपचे निवडणूक आयोगाशी संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला.

‘मतचोरी’ची चित्रफीत

काँग्रेसने बुधवारी बनावट मते कशी टाकली जातात, हे दर्शवणारी एक नवीन चित्रफीत प्रसिद्ध करत आपली कथित ‘मतचोरी’विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. ‘आपल्या मतदानाची चोरी ही आपल्या अधिकारांची, आपल्या अस्तित्वाची चोरी आहे’, असे या चित्रफितीत नमूद केले आहे.

‘आयोग-भाजप संगनमत’

‘मतचोरी’साठी निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत केल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी केला. मतदारयादीतील कथित अनियमितता दूर न केल्यास ‘राजद’ विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकू शकते, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

‘रायबरेली, वायनाड, कन्नुज ते डायमंड हार्बर, सर्वत्र एकच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी बनावट मतदार का बनवले? ‘मत चोरी’ आणि घुसखोरांना संरक्षण दिल्याबद्दल ते राजीनामा देतील का?- अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री