निर्णय प्रक्रियेतील असाधारण विलंब, लालफितीचा कारभार, जमीन अधिग्रहण करण्यात येणाऱ्या अडचणी आणि खनिजे मिळविण्यातही येणाऱ्या अडचणींना कंटाळून आर्सेलर मित्तल समूहाने ओदिशातील आपला सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा पोलाद प्रकल्प बुधवारी मोडीत काढला.
मित्तल हे जगातील सर्वात मोठे असे पोलाद उत्पादक मानले जात असून या निर्णयामुळे देशात परकीय गुंतवणूक येण्यास मोठी खीळ बसली आहे. दक्षिण कोरियाच्या पॉस्को कंपनीने कर्नाटकातील आपला सुमारे ३० हजार कोटींचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर मित्तल समूहाच्या या निर्णयामुळे पोलाद उद्योगास मोठाच धक्का बसल्याचे मानले जाते.
आर्सेलर मित्तल समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ओदिशा सरकारच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांना या निर्णयाची माहिती दिली. अर्थात, झारखंड आणि कर्नाटकातील आपले पोलाद उद्योगाचे कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय मित्तल समूहाने घेतला आहे.
देश म्हणून भारताचे स्थान माझ्या मनात सर्वोच्च आहे. गुंतवणुकीसाठी मात्र अग्रक्रम कधीच नाही. इतकी रखडपट्टी होते की प्रकल्प वेळेत सुरूच होत नाहीत.
-लक्ष्मीनारायण मित्तल
(गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये)